

Man who adulterated khawa and paneer with dangerous chemicals released on notice
बीड, पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथे खवा आणि बफीमध्ये घातक सॅफोलाईटसारख्या पदार्थाची भेसळ करणाऱ्या व्यावसायिकाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्याच्यावर दाखल कलमांमध्ये जामीनाची तरतूद असल्याने तपासात सहकार्य करण्याच्या नोटीस त्याला सोडण्यात आले. आता त्या ठिकाणचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच कारवाई होऊ शकणार आहे. पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाकडून आता कारवाई केली जात असली तरी केवळ नोटीसवरच असे मेसळखोर सुटत असल्याने सर्वसामान्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
१ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन, बीड आणि शिरूर कासार पोलिसांच्या संयुक्त पथकाने मे. जय श्री कृष्णा केक अँड बफीं, दहीवंडी येथे गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनात अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे नियम धाब्यावर बसवून अत्यंत अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात बर्फी व मिल्क केकचे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले.
उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल तसेच तयार अन्नपदार्थाचे नमुने विलेषणासाठी जप्त करण्यात आले. यामध्ये मिल्क केक (व्हाईट), ब्राऊन बर्फी, खोवा, रवा, रिफाइंड पामोलीन तेल, मोतीचूर दाणा तसेच 'सॅफोलाइट' हा संशयित भेसळकारी पदार्थ यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान या प्रकरणात या उत्पादन केंद्राचा मालक कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित (वय 22, रा. दहीवंडी, ता. शिरूर कासार) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चे कलम 57 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 274 व 275 अंतर्गत शिरूर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु या कलमांमध्ये जामीनाची तरतूद असल्याने पोलिसांनी कार्तिक राजपुरोहित याला केवळ नोटीस देऊन सोडले आहे.
भेसळखोरांवर धाक निर्माण होणार कसा ?
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. परंतु केवळ कारवाई झाल्यानंतर माल नष्ट करणे आणि दंड करण्याचेच अधिकार या विभागाला आहेत. जास्तीत जास्त गुन्हा दाखल झाला तर त्यातूनही केवळ नोटीस देऊन सोडावे लागते. जप्त करण्यात आलेला माल प्रयोगशाळेला पाठवून त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होते. या सर्व प्रक्रियेला मोठा कालावधी लागतो. भेसळ करूनही कायद्याच्या कचाट्यातून सहज सुटता येत असल्याने अशा भेसळखोरांचे मनोबल मात्र वाढत आहे.