

गेवराई : गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात घरकुलधारकांच्या नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महसूल विभागातील दोन तलाठी, कोतवालासह एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित वाहनधारकांवर सुमारे ९० कोटी रुपयांचा दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात तहसीलदार संदीप खोमणे हेही अडचणीत आले आहेत.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राक्षसभूवन येथील गोदावरी नदीपात्रातून सुमारे २० हजार ब्रास अतिरिक्त वाळूचा अवैध उपसा झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकारानंतर गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. सदर चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठविला असून पुढील निर्णय शासन स्तरावर घेतला जाणार आहे.
या प्रकरणी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सुरुवातीपासूनच सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली.पहिल्या टप्प्यात तलाठी किरण दांडगे, तलाठी गोविंद ढाकणे, कोतवाल शुभम गायकवाड, कंत्राटी कर्मचारी विश्वजित शेंबडे यांच्यासह अन्य संबंधितांविरुद्ध नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय ई-टीपीसाठी ओटीपी उपलब्ध करून देणारे आणि अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरल्या गेलेल्या वाहनांचे धारक अशा सुमारे १५ खासगी व्यक्तींनाही आरोपी करण्यात आले आहे.
अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात आलेल्या वाहनधारकांवर अंदाजे ९० कोटी रुपयांचा दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू असून, इतर संबंधितांवरही प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफिया तसेच महसूल विभागातील संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.