

धारूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना माजलगाव मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांपेक्षा महायुतीतील नेतेच एकमेकांवर तुटून पडल्याने मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ज्येेष्ठ आमदार प्रकाश सोळंके आणि भाजपचे नेते माधव निर्मळ यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत असून आरोप-प्रत्यारोपांची पातळीही अधिक धारदार होताना दिसत आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांनी अलीकडेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते माधव निर्मळ यांनी जोरदार पलटवार केला. "गरज सरो अन् वैद्य मरो" हीच सोळंके यांची राजकीय कार्यपद्धती असल्याचा आरोप करत त्यांनी सोळंकेंना थेट लक्ष्य केले.निर्मळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या सभांमुळेच प्रकाश सोळंके यांना विजयाचा मार्ग सुकर झाला होता. आज त्याच नेत्यांवर टीका करणे म्हणजे राजकीय कृतघ्नतेचे उदाहरण असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
"मी कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करतो. कार्यकर्त्यांच्या घामातून नेतृत्व घडते. त्यामुळे स्वतःच्या ताकदीच्या बढाया मारणाऱ्यांनी वास्तव विसरू नये," असा टोला लगावत निर्मळ यांनी सोळंकेंच्या राजकीय दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.निर्मळ यांनी यावेळी आणखी एक राजकीय बॉम्ब टाकला. निवडणुकीत बाबरी मुंडे यांना उभे करण्यामागेही प्रकाश सोळंके यांचीच अप्रत्यक्ष भूमिका होती, असा दावा त्यांनी केला. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, सहकाऱ्यांना अडचणीत आणणे आणि सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांशी दादागिरीची भाषा वापरणे, असे गंभीर आरोपही त्यांनी केले.
मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत निर्मळ म्हणाले की, माजलगावच्या विकासात दिवंगत सुंदरराव सोळंके आणि गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. मात्र पाच वेळा आमदार राहिल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी किती उद्योग, रोजगार आणि गुंतवणूक मतदारसंघात आणली याचा खुलासा जनतेसमोर करावा."केवळ निवडणुका जिंकणे म्हणजे विकास नव्हे. मतदारसंघाला काय दिले, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर प्रकाश सोळंके त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप निर्मळ यांनी केला. त्यामुळे माजलगावच्या राजकारणात आता मराठा आरक्षणाचा मुद्दाही अप्रत्यक्षपणे डोकावू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.निर्मळ यांनी सर्वात मोठे आव्हान देताना म्हटले की, "जर पंकजा मुंडे यांची गरज नव्हती असे वाटत असेल, तर आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी. जनता कोणाच्या पाठीशी उभी आहे हे स्पष्ट होईल.
"राजकीय निरीक्षकांच्या मते, ही केवळ वैचारिक लढाई नसून मतदारसंघातील वर्चस्व सिद्ध करण्याची चुरस आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.माजलगावच्या राजकीय आखाड्यात सध्या विरोधकांपेक्षा मित्रपक्षातील नेतेच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आगामी काळात या वाक्युद्धाचे रूपांतर थेट राजकीय संघर्षात होते की पुन्हा समेटाचे प्रयत्न होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ऐन निवडणुकीतच महायुतीमध्ये महाभारत
सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक दोन दिवसांवर आली असताना माजलगावमध्ये एकीकडे आमदार प्रकाश सोळंके यांचे वक्तव्य आणि दुसरीकडे माधव निर्मळ यांचे तितकेच आक्रमक प्रत्युत्तर यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.