

माजलगाव : माजलगाव विधानसभेचे विद्यमान आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान रविवारी (दि.४) आपली राजकीय निवृत्ती घोषित करत पुतण्या जयसिंग सोळंके हाच आपला राजकीय वारस असल्याचे जाहीर केले. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत काका की पुतण्या या वादावर पडदा पडला असून. मात्र जयसिंग सोळंके यांना महायुतीकडून उमेदवारी मिळवून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी शेवटची निवडणूक आहे. मतदारांना संधी देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ते अल्पशा मताने माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. याही वेळी त्यांनी आपले नशीब आजमण्याचा प्रयत्न करत असताना मराठा आरक्षणाचा वादातून आमदार सोळंके यांचे आंदोलनाकांनी घर जाळले, त्यातून आमदार प्रकाश सोळुंके प्रचंड खचलेले होते.
माजलगाव विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला की भाजपला सुटते, याबाबत शासकंता असतानाच विधानसभेच्या कामाला लागलेले आमदार प्रकाश सोळुंके यांनी रविवारी माजलगाव तालुक्यातील गोदापात्रातील गावात संपर्क दौऱ्यादरम्यान मी वयोमानानुसार माझी निवडणूक लढवण्यामधून राजकीय निवृत्ती घेत असल्याचा धक्कादायक निर्णय कार्यकर्त्यांना बोलवून दाखविला. व त्याचवेळी आपले पुतणे बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग सोळंके हेच माझे पुढील राजकीय वारसदार असतील असे जाहीर केले. यावरून आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला असल्याचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव मतदार संघातील महायुतीने केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांची पिछेहाट होत असल्याच्या रिपोर्टनुसार अजित पवार गटाची असणारी जागा धोक्यात असल्याने आपणास उमेदवारी मिळणार नसल्याच्या संकेतानुसार आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय फरफराट नको. म्हणून त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन आपले पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे करत त्यांना भविष्यातील संधी द्यावी, असे आव्हान केले असावे, अशी माजलगाव मतदार संघात चर्चा होत आहे.