

Lok Ladha protesters met Mahant Namdev Shastri
बीड : पुढारी वृतसेवा
बीडसह शिरूर, गेवराई, वडवणी व माजलगाव तालुक्यातील १४० पेक्षा अधिक गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे यासाठी लोकलढा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे समन्वयक राहुल लोंढे, दिनेश गुळवे व शिष्टमंडळाने आज रविवारी श्री क्षेत्र भगवानगडचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेत वंचित असलेल्या दुष्काळी भागाला जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे, यासाठी मदत करण्याची भावना व्यक्त केली. या मागणीसाठी आपण सहकार्य करण्याचा विश्वास यावेळी महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी व्यक्त केला.
यावेळी गहिनीनाथ पालवे, बाळासाहेब सानप, प्रभाकर बांगर, गिरधारी सांगळे, विष्णू बांगर, समन्वयक दिनेश गुळवे, राहुल लोंढे, संतोष कारंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर ते माजलगाव पर्यंत सिंदफणा काठचे व महामार्ग लगतच्या शेतकर्यांना सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागते. या भागाचा दुष्काळ दूर व्हावा यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी लिफ्ट करून सिंदफणा नदी पात्रात सोडावे व महामार्ग लगत उपकालवा करावा यासाठी दोन वर्षांपासून १४० गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनातील शेतकऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रजनीताई पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींची भेट घेत, जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे ही मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने सर्वे करावा अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
हा सर्वे तात्काळ व्हावा, यासाठी लोकलढा आंदोलनाच्या शिष्टमंडळाने आज रविवारी गेवराई तालुक्यातील उक्कडपिंपरी येथे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. या मागणीसाठी १४० गावच्या ग्रामपंचायतने ठराव दिले आहेत, हे ठराव व इतर कागदपत्रे याची माहितीही यावेळी समन्वयक राहुल लोंढे यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांना दिली. यावेळी महंत नामदेव शास्त्री महाराज म्हणाले, की लाखो शेतकरी कुटुंबाच्या कल्याणाची ही मागणी आहे, यासाठी आपण सर्वोतोपरी पाठीशी असल्याचे सांगून यासाठी आपणही पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे देणार पत्र
नदीजोड प्रकल्पामध्ये गोदा-वरी-सिंदफणा नदीजोड योजनेचा समावेश करावा व जायकवाडीचे पाणी सिंदफणा पट्ट्यातील वंचित शेतकर्यांना द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. लोकलढा आंदोलनाचे शिष्टमंडळ लवरच श्री क्षेत्र भगवानगड येथे जाणार आहे. या शिष्टमंडळाकडे हे पत्र देणार असून आपणही या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलू, असेही यावेळी महंत नामदेव शास्त्री महाराज म्हणाले.