

Licenses of thirteen agricultural vendors suspended for not using e-POS
बीड, पुढारी वृत्तसेवा : ई पॉस मशीन वरील खत साठा व प्रत्यक्ष विक्रेत्याकडील खत साठा तपासणी मोहीम चालू आहे. या मोहिमेमध्ये कृषी निविष्ठा विक्री केंद्र तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी नुसार ई पॉस मशीन व प्रत्यक्षातील खत साठा मधील तफावत, ई पॉस मशोनवरून खताची विक्री न करणे, शेतकऱ्यांना पक्के बिल न देणे, साठा रजिस्टर अद्ययावत न करणे, भावफलक न लावणे इ. तपासणीतील आढळून आलेल्या त्रुटीवरून जिल्ह्यातील खालील १३ कृषी निविष्ठा विक्रेते केंद्रावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्याकडून सुनावणी घेऊन परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मे. रवींद्र ट्रेडिंग कंपनी अंबाज ोगाई, ता. अंबाजोगाई, में श्री फर्टिलायझर्स केज, ता. केज, मे. गणेश कृषी सेवा केंद्र, युसुफवडगाव, ता. केज, मे. सौरव अॅग्रो एजन्सी, जाधवजवळा, ता. केज, मे. शिवप्रसाद कृषी सेवा केंद्र, नांदुरघाट, ता. केज, मे. दत्तकृपा अॅग्रो एजन्सीज अंबाजोगाई, मे. सचिन कृषि सेवा केंद्र, युसुफवडगाव, ता. केज, मे. महावीर कृषी सेवा केंद्र कडा, ता आष्टी, मे. कोहिनूर कृषी सेवा केंद्र, पात्रुड ता. माजलगाव, मे. व्यंकटेश कृषी सेवा केंद्र माजलगाव ता. माजलगाव, मे. माऊली अग्रो एजन्सी, धारूर (१२) मे. विजय कृषी सेवा केंद्र, पाटोदा, मे. भैरवनाथ कृषी सेवा केंद्र, पाचंग्री ता. पाटोदा या कृषी सेवा केंद्रांचा यामध्ये समावेश आहे.
प्रत्यक्षात खत साठा नसतानाही ई पॉसमशिन वर खत साठा शिल्लक असल्यास जिल्ह्यात खत पुरवठ्यात अडचणी निर्माण होतात. या कारणास्तव ही तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. खत उत्पादक कंपनी जिल्हा प्रतिनिधी यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत की, ई पॉस मशीनवर खतसाठा तपासणी करून खताचे वितरण करावे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांचेमार्फत सर्व विक्रेत्यांना सूचना करण्यात येते की, प्रत्यक्षात खत साठा व ई पॉस मशीन वरील खत साठा जुळला पाहिजे, ई पॉस मशीनवरून खताची विक्री करावी, शेतकऱ्यांना खत खरेदीचे पक्के बिल द्यावे, साठा रजिस्टर अद्यावत करणे, भावफलक लावणे इत्यादी बाबी पूर्तता करावी अन्यथा खत नियंत्रण आदेश १९८५ व परवान्यातील अटी व शर्तीचा भंग केला असे समजून विक्रेत्यानच्या परवान्यावर निलंबन रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.