

आष्टी (बीड) : तालुक्यातील सुलेमान देवळा, भोजेवाडी, गहूखेल, म्हसोबावाडी या पंचक्रोशीत गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून शेतकर्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने चार शेळ्यांचा बळी घेतला असून नुकतीच घडलेली म्हसोबा वाडीतील घटना ग्रामस्थांना अधिकच हादरवून गेली आहे.
म्हसोबावाडी येथील शेतकरी मोहन बाबू शेकडे हे नेहमीप्रमाणे आपल्या कुरांना शिवारात चारण्यासाठी गेले असता त्यांची एक शेळी संध्याकाळी अचानक गायब झाली. शोधाशोध करत असताना ती शेळी शिवारातच मृतावस्थेत आढळली. याची माहिती तत्काळ वनविभागाचे कर्मचारी बन्सी तादंळे यांना देण्यात आली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर, पत्रकार प्रेम पवळ यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करून ही शेळी बिबट्यानेच ठार मारल्याचे स्पष्ट करण्यात आले.गेल्या दोन महिन्यांत या पंचक्रोशीत वारंवार बिबट्याचा वावर दिसून आला आहे. आतापर्यंत चार शेळ्या बळी गेल्या असून शेतकरी भयभीत झाले आहेत. महिलांना संध्याकाळनंतर शिवारात जाण्यास धाडस होत नाही. शेतकर्यांना तर गुरे, ढोरे चारण्यासाठी दिवसादेखील दहशतीखालीच जावे लागत आहे.
घटनेची माहिती मिळताच म्हसोबावाडीचे सरपंच शिवा शेंडे यांनी शेतकर्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वनविभागाला निवेदन देऊन तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.घटनास्थळी शेतकरी मोहन शेकडे, सतीश शेकडे, वनकर्मी बन्सी तादंळे, कृष्णा बडे, बाबासाहेब बडे, अशोक बडे, अविनाश खोरदे, तसेच दैनिक पुढारीचे पत्रकार प्रेम पवळ उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे या पंचक्रोशीत भीतीचे सावट अधिकच गडद होत चालले असून, ग्रामस्थ वनविभागाकडून ठोस कारवाईची अपेक्षा करत आहेत.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, शेतकर्यांना भरपाई द्यावी, पंचक्रोशीत रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी.