

गौतम बचुटे
केज : एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल झालेले केजचे फरार प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १८ सप्टेंबर, गुरुवार रोजी सायंकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी ही तिच्या मानलेल्या मावशी सोबत केक आणण्यासाठी रस्त्याने जात होती. त्यावेळी केज येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हा त्यांना नाष्टा व चहा पाणी करण्याच्या निमित्ताने त्याच्या चार चाकी गाडीत बसवून धारूर चौकातून चिंचपूरच्या मारुती मंदिराच्या रस्त्याने कोल्हेवाडीकडे घेऊन गेला.
कोल्हेवाडीच्या रस्त्याच्या कडेला एका निर्जनस्थळी गाडी थांबवून गाडीमध्ये त्या अल्पवयीन मुलीच्या हाताला वाईट हेतूने धरून तिच्या खाजगी अवयवांना वाईट हेतूने स्पर्श करून त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरून जात त्या अल्पवयीन मुलीने व तिच्या सोबतच्या महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर त्या रस्त्याने मागून आलेल्या एका वाहनाच्या प्रकाशने घाबरून जात लक्ष्मण बेडसकर हा त्याची गाडी आणि मोबाईल तेथेच ठेवून पळून गेला होता.
त्यानंतर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री १०:४४ वाजता प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध गु. र. नं. ५०९/२०२५ भा. न्या. सं. ७४, ७५(१)(२), ३५१(२) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या लक्ष्मण बेडसकर हा फरार आहे.
दरम्यान लक्ष्मण बेडसकर याने वकिला मार्फत दि. २२ सप्टेंबर रोजी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर दि. २९ सप्टेंबर रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि तीव्रता पाहता लक्ष्मण बेडसकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता राम बिरंगळ यांनी काम पाहिले.