

Kej Shirpur assault case
गौतम बचुटे
केज : घरातील दसरा काढण्यावरून नवरा बायकोत भांडण झालं. अन् त्याची वार्ता सासुरवाडीत पोहोचतच सासरे आणि मेव्हण्याने जावयाला मारहाण करून उचलून आपटला. तर या भांडणात सुनबाई सुद्धा मागे राहिली नाही, तिने सुद्धा सासूला कडकडून चावा घेतला. तसेच पती-पत्नीच्या आई-वडिलांमध्ये देखील मारामारी झाली आहे.
दसरा म्हटले की, घरातील साफसफाई, धुणीभांडी व स्वच्छता करण्याचे काम सुरू होते. यात जास्त करून महिला मंडळींना अधिक ताण पडतो तर पुरुष मंडळी देखील मदत करतात. दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील शिरपुरा येथे घरातील दसरा काढण्या वरून अशोक बळीराम घुले व त्याची पत्नी जयश्री यांच्यात भांडण झाले. नवरा बायकोच्या भांडणाची माहिती जयश्रीचे माहेर डोणगाव (ता. केज) येथे माहिती झाल्यानंतर दि. १४ सप्टेंबर रोजी अशोक घुलेचे सासू-सासरे आणि मेव्हणा हे शिरपूरा येथे आले.
त्यांनी अशोक घुले यास भांडणाचा जाब विचारला आणि मेव्हणा कृष्णा चौरे याने अशोक घुले यांच्या गच्चीला धरुन डोक्यावर आपटल्याने त्याचे डोके फुटले. सासरा देविदास चौरे याने अशोकचे वडील बळीराम घुले यांच्या डोक्यात व पाठीवर काठीने मारुन दुखापत केली. तसेच सासू उर्मिला चौरे हिने अशोकच्या आईला केसाला धरून चापटा-बुक्यांनी व लाथा-बुक्क्याने मारहाण केली. अशोकची पत्नी जयश्रीने तिच्या सासूच्या उजव्या हातावर चावा घेतला. त्या सर्वांनी अशोक घुले व त्याच्या आई-वडिलांना मारहाण करून आमच्या मुलीला नीट नांदवा; नाही तर सर्वांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी अशोक घुले याच्या तक्रारी वरून कृष्णा देविदास चौरे, देविदास सत्यभान चौरे, उर्मीला देविदास चौरे या मेव्हणा, सासरा आणि सासूसह पत्नी जयश्री अशोक घुले यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलिस जमादार प्रल्हाद चव्हाण करीत आहेत.