

Parli Vaijnath Paul Pimpri incident Labourer
परळी वैजनाथ : पैशाच्या कारणावरून वारंवार जातीय शिवीगाळ व दमदाटी सहन करावी लागल्याने नैराश्यात जाऊन एका मजुराने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुंडलिक पिराजी वैराळ (रा. पौळ पिंपरी, ता. परळी वैजनाथ) यांनी दि. 20 मार्चरोजी रात्री 11 वा. ते दि. 21 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान आरोपी राम महादेव पौळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले.
या घटनेप्रकरणी मृताची पत्नी शांताबाई कुंडलिक वैराळ (वय 55, व्यवसाय मजुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम महादेव पौळ (रा. पौळ पिंपरी) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी हा पैशाच्या वादातून वारंवार जातीय शिवीगाळ करून दमदाटी करत होता.
सततच्या मानसिक छळाला कंटाळून व नैराश्यात जाऊन कुंडलिक वैराळ यांनी जीवन संपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची नोंद दि. 22 मार्च रोजी करण्यात आली असून, पुढील तपास माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके करीत आहेत.