

केज तालुक्यातील कुंबेफळ गावात माहिती अधिकारातून मागितलेल्या कागदपत्रांच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाला असून, ग्रामपंचायतीत गेलेल्या तरुणाच्या मित्राला उपसरपंचाच्या पतीकडून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात दगड, गजाचा तुकडा वापरून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले असून, पीडिताला जीव घेण्याचीही धमकी देण्यात आली आहे.
कुंबेफळचे शेखर उध्दवराव थोरात हे गेल्या दीड वर्षांपासून ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विकासकामांबाबतची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागत होते. मात्र, अनेक अर्ज देऊनही त्यांना अद्याप माहिती मिळाली नव्हती. विलंब होत असल्याने शेखर थोरात यांनी पंचायत समिती केज आणि जिल्हा परिषद बीड येथे ग्रामसेवकांविरोधात तक्रारही दाखल केली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशीसाठी समितीही गठित करण्यात आली होती.
याचदरम्यान, गावातील विशाल अशोक थोरात यानेही माहिती अधिकारातून ग्रामपंचायतीची माहिती मागितली होती. त्यासाठी ग्रामसेवकांनी त्याला २,८०६ रुपयांचे चलन भरण्यास सांगितले होते. चलन भरल्यानंतर पावती जमा करण्यासाठी विशाल व शेखर थोरात दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ग्रामपंचायतीत गेले. त्यावेळी ग्रामसेवक रेवती भोसले-चव्हाण यांनी त्यांना थोड्या वेळाने येण्यास सांगितले.
दुपारी साडेबारा वाजता दोघे पुन्हा ग्रामपंचायतीत गेले असता तेथे उपसरपंच श्रद्धा थोरात यांचे पती विष्णु दगडू थोरात आणि त्यांचा भाऊ बालासाहेब थोरात उपस्थित होते. शेखर यांनी ग्रामसेवकांकडे अर्जावरील माहिती मागितली असता, त्यांना १० ते १५ दिवस लागतील असे सांगण्यात आले. एवढा मोठा कालावधी का लागत आहे? अशी विचारणा केली असता, शेखर यांना ग्रामसेवकांकडून टाळाटाळ स्वरूपाचे उत्तर मिळाले.
दरम्यान, शेखर यांनी संपूर्ण संभाषणाचे मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू केले. मोबाईल रेकॉर्डिंग सुरू होताच उपसरपंचांचे पती विष्णु थोरात यांनी संतापाने शेखरचा मोबाईल हिसकावून खाली फेकला. त्यानंतर त्यांनी शेखर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ग्रामपंचायतीच्या बाहेर खेचले.
ग्रामपंचायतीच्या बाहेर पडताच विष्णु थोरात यांनी दगड फेकून शेखर यांच्या उजव्या पायाला मार लागला. इतकेच नव्हे, तेथे पडलेल्या लोखंडी गजाच्या तुकड्याने त्यांच्या हातावर वार करण्यात आला. त्यांचा भाऊ बालासाहेब थोरात यानेही शेखरला मारहाण केली. यावेळी दोघांनीही “तक्रार केलीस तर जीवे मारू” अशी धमकी दिली असल्याचे पीडिताने नमूद केले आहे.
घटनेनंतर शेखर थोरात यांनी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विष्णु दगडू थोरात आणि बालासाहेब थोरात या दोघांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम ११५(२), ११८(१), ३५२(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना केज तालुक्यात मोठी खळबळ उडवणारी असून, माहिती अधिकारातून माहिती मागणे म्हणजे एवढा मोठा धोका ओढवून घेणे का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तपास पोलिस जमादार केशव खाडे यांच्या मार्फत सुरू आहे.