

केज : केज शहरात पोलिसांसह दंगल नियंत्रक पथक शुक्रवारी (दि.५) सायरन वाजवित दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हॅन्डग्रेड व अश्रुधुराचे नळकांडे काढून त्याचे हवेत फायर करायला सुरुवात केली. हा नेमका प्रकार काय सुरू आहे? याची माहिती नागरिकांना नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले.
याबाबत माहिती अशी की, सध्या गणेशाचे विसर्जन आणि ईद- -ए-मिलादच्या अनुषगांने पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात दाखल झाला असून दंगल नियंत्रण पथक आणि त्यांच्या मदतीला गृहरक्षक दल देखील तत्पर आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी आदेश देताच शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ६.३० च्या सुमारास एका मागोमाग पोलिस दंगल नियंत्रण पथक आणि गृह रक्षक दलांच्या जवान त्यांच्या वाहनातून सायरन वाजवीत बीड रोडने शारदा इंग्लिश स्कूलच्या दिशेने रवाना झाले. शारदा इंग्लिश स्कूलजवळ येताच सर्व पोलिसांनी पटापट गाडीतून उड्या मारल्या आणि धावपळ करीत ॲक्शन घेत पोझिशन घेतली. तेवढ्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना परिस्थितीचे ब्रिफिंग केले आणि पोलिस निरीक्षकांनी आदेश देताच दंगल नियंत्रण पथकाचे जवान यांनी हॅन्डग्रेड व अश्रुधुराचे नळकांडे काढून त्याचे हवेत फायर करायला सुरुवात केली.
ही कारवाई सुरू असताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली. नेमका हा काय प्रकार आहे. याची कुणालाच कल्पना नव्हती. यामुळे प्रत्येकजण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होता. आणि एक प्रकारचा तणाव आणि दबाव निर्माण झाल्याचे जाणवत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली. या सर्व प्रकाराची माहिती पत्रकारांना मिळाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर शहरात काहीही घडलेले नसून हा पोलिसांचा सराव असल्याचे सांगण्यात आले. याची माहिती मिळताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.