

केज : पाणीपुरी विक्रेत्याने लवकर पाणीपुरी खायला दिली नसल्याने तरूणाचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने पाणीपुरी विक्रेत्यावर स्क्रू ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.ही घटना मंगळवारी (दि.२) दुपारी १.३० च्या सुमारास केज तहसील कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी बंडू घुले या तरूणावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब रामभाऊ ढवळे हे केज तहसील कार्यालयासमोर पाणीपुरी आणि चाट भांडारचा गाडा लावून व्यवसाय करतात. मंगळवारी दुपारी १:३० च्या सुमारास तहसील कार्यालय केज समोर ते पाणी पुरीचा गाडा लावुन नेहमी प्रमाणे व्यवसाय करीत असतांना तेथे बंडु वैजनाथ घुले (रा. टाकळी ता. केज) हा तरूण आला आणि त्याने पाणीपुरी मागितली. परंतू बाळासाहेब ढवळे हे त्याच्या अगोदरच्या गिऱ्हाईकाला पाणीपुरी देत होते. त्यामुळे त्यांनी बंडू घुले याला थोडावेळ थांबण्यास सांगितले. थांबायला सांगितल्याने त्याचा राग अनावर झाला. व त्याने ढवळे यांना मारहाण करत त्यांच्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करत त्यांना जखमी केले. त्याबरोबर ढवळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यात जखमी झालेल्या ढवळे यांच्या हाताला चार टाके पडले आहेत. याप्रकरणी बाळासाहेब ढवळे याच्या तक्रारीवरून बंडू घुले यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.