

Kej Dharur Fraud incident
गौतम बचुटे
केज : माझे मामा जिल्हाधिकारी असून मी त्यांचा भाच्चा आहे. तुमच्या संस्थेला जमीन मिळवून देतो, असे सांगून चक्क एका जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला ८ लाख २० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. फसवणूक केलेल्या कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे माझे मामा असून मी त्यांचा भाच्चा आहे. असे सांगून बीड जिल्हा परिषदेचे कर्मचारी विनायक कराड यांना बीड जिल्ह्यातील महेश सुधाकर कुलकर्णी (रा. उदय नगर, धारूर) याने संत गजानन महाराज संस्थानला केज येथील सर्व्हे नं. ३२ या सरकारी गायरान जमिनीतील जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी ५० हजार नगदी रोख स्वरूपात घेतले.
त्यानंतर वेगवेगळ्या तारखेला कराड यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने ७ लाख ७० हजार ४०० रु. आणि त्यांच्या पत्नीकडून १ लाख ११ हजार ६०० रुपये असे एकूण ८ लाख २० हजार ४०० रुपये घेऊन फसवणूक केली. विनायक कराड यांनी त्यांना सदर जमीन ही संस्थानला देण्यासंबंधी वारंवार विनंती करूनही त्यांची मागणी पूर्ण केली नाही किंवा त्यांनी दिलेले पैसे देखील परत केले नाहीत. म्हणून विनायक कराड यांनी दि. १५ ऑक्टोबररोजी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची भेट घेऊन त्यांना लेखी अर्जाद्वारे त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी महेश कुलकर्णी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महेश कुलकर्णी यांनी एका कर्मचाऱ्यांची केलेली फसवणूक ही उघड झालेले आहे. मात्र, अशा प्रकारे त्यांच्याकडून अनेकांची फसवणूक झाली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही.