

केज : केज-मांजरसुंबा महामार्ग क्रमांक ५४८-डीवर सोमवारी सकाळी सहा वाजता झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. केजजवळील कदमवाडी पाटीजवळ ही दुर्घटना घडली. एमएच-०२/सीएच-६७८९ क्रमांकाची कार वेगावर नियंत्रण सुटल्याने पुलाला जाऊन धडकली. या अपघातात परळी येथील बूट-चप्पलचे होलसेल व्यापारी इम्रान इब्राहिम कच्छी (५०) आणि गाडी चालक अझरुद्दीन बाबुमिया शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बारगजे आणि पोलिस जमादार रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविले. याशिवाय पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, पोलिस नाईक शेख रशीद आणि वाहनचालक रामहरी शिंदे यांनीही नागरिकांच्या मदतीने मृतदेह ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात पोहोचविण्यास सहकार्य केले.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. कारच्या भीषण अवस्थेमुळे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून, मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाणार आहेत.
या अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु भरधाव वेग आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अपघातानंतर स्थानिकांकडून महामार्गावर वेगमर्यादेचे काटेकोर पालन करण्याची मागणी होत आहे. तसेच पुलाजवळ वेग कमी करण्यासाठी चेतावणी फलक व गतीरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.