

Huge march of Banjara community in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा: बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी बीडमध्ये सोमवारी (दि.१५) विराट मोर्चा काढण्यात आला. सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी बंजारा समाज हक्काचा वाटा मागतोय, आम्ही भिक मागत नाहीत, आम्ही कोणाच्या ताटातले मागत नाहीत किंवा कोणाचे खरकटेसुध्दा मागत नाहीत. कारण बंजारा समाज हा स्वाभिमानी समाज आहे. बंजारा समाज एवढा लाचारसुध्दा नाही की, कोणाचे खरकटे मागेल, अशा शब्दांत आपल्या भावना बंजारा समाजातील मुलींनी मांडल्या. मुलींच्याच हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांना निवेदन सादर करण्यात आले.
बीडमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी एक वाजेनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, बसस्टँड समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपरिक वेषभूशेत सहभागी झाला होता.
एकच मिशन एसटी आरक्षण, अशा घोषणांचे फलक हाती घेत लेल्या समाजबांधवांनी एसटी आरक्षणाची आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली. या मोर्चाला जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील युवतींनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी मोर्चात बंजारा समाजाचे धर्मगुरू बापूसिंग महाराज, आ. धनंजय मुंडे, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर, मराठा समन्वयक, गंगाधर काळकुटे, योगश क्षीरसागर यांच्यासह समाज बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चामध्ये जिल्ह्यातून दाखल झालेल्या महिला भगिनींना पारंपरिक वेशभूषेत येत आपली मागणीची घोषणा देताना शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी देवी येथील महंत बाबूसिंग महाराज बीड येथील एसटी आरक्षण मोर्चा रॅलीत सहभागी झाले होते.
बंजारा समाजाच्या कुठल्याही लढाईत शिवछत्र परिवार कायमसोबत राहिला आहे. आज लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या न्याय हक्काची लढाईत पंडित कुटुंबीय नेहमी सोबत राहिले आहे. यापुढे सोबत राहत फक्त पाठिंबाच देत नसून येणाऱ्या काळात विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे मत गेवराईचे आ. विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले.