

अंबाजोगाई ः भारत ही बुद्धभूमी आहे. सम्राट अशोक यांनी भारतासह जगात बुध्द धम्म रुजविला. तर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द धम्माचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे जगाला युद्धाची नाही तर बुध्दाची, शांतीची, डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची जगाला गरज आहे. धम्म आचरणाने माणूस सदाचारी बनतो. असे प्रतिपादन करुणानंद महाथेरो यांनी केले.
परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार, दिनांक 7 मार्च रोजी बाराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेचे उद्घाटन पुज्य भिक्खू करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुज्य भिक्खू धम्मशील आणि पूज्य भिक्खू पय्यावर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी धम्म परिषदेचे कार्यवाह ॲड.अनंतराव जगतकर, ले.कर्नल डॉ.एम.एच. कांबळे, डॉ.राजेश इंगोले, संग्राम गित्ते, सौ.शाहू विजय राठोड, आनंद तुपसमुद्रे, मिलिंद नरबागे, आनंद वाघमारे, प्रशांत गिते, सुरेश मिसाळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सरोजाताई गौतम डावरे, अर्चनाताई महेंद्र रोडे, नितीन नामदेव रोडे, महादेव नागनाथ रोडे, कविताताई अनंत इंगळे, तसेच परळी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक - नगरसेविका यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ॲड.अनंतराव जगतकर, डॉ.राजेश इंगोले, नगरसेवक अर्चनाताई रोडे, प्रा.डॉ.प्रदीप रोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले. तर सूत्रसंचालन राहुल सुरवसे, सचिन रणखांबे यांनी करून उपस्थितांचे आभार जगन सरवदे यांनी मानले. धम्म परिषदेच्या ठिकाणी परळी ग्रामीण पोलिस यांचे सुरक्षा पथक उपलब्ध करून देण्यात आले होते.
तसेच तालुका आरोग्य विभागाकडून आरोग्य पथक आणि परळी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता वाहन उपलब्ध करून देण्यात आले होते. या धम्म परिषदेत महत्वपूर्ण 13 ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले. हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. ठरावांचे वाचन प्रा.गौतम गायकवाड यांनी केले.
धम्म आचरण काळाची गरज
या प्रसंगी धम्म देसना देताना पुज्य भिक्खू करुणानंद महाथेरो म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांवर धम्म संस्कार करणे, धम्मावर श्रध्दा ठेवणे, प्रत्येक रविवारी विहारात जाणे, धम्म परिषदा घेणे, भिक्खूंची प्रवचने ऐकणे, धम्म ग्रंथांचे वाचन करणे, धर्मकार्य करणे, धम्मदान करणे गरजेचे आहे. पैसे घेऊन मतदान न करता गुणवत्तेला महत्त्व द्यावे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर घराघरात जन्माला आले पाहिजेत. धम्म आचरण ही काळाची गरज असल्याचे पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो यांनी सांगितले. यावेळी पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी धम्म परिषदेस उपस्थित उपासक, उपासिका यांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या.