

30 lakh trees planted in a single day in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढण्यासाठी हरित बीड अभियान राबवले जात आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या अभियानात जिल्हाभरात एकाच दिवशी तीस लाख वृक्ष लागवड करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात वनक्षेत्र अतिशय कमी आहे यामुळे अनेकदा पावसाची नियमितता दिसून येते. हे वनक्षेत्र वाढावे यासाठी वन विभागासह जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत हरित अभियान राबवले आहे. या अंतर्गत एकाच दिवशी ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आले असून एक पेड माँ के नाम हा उपक्रमदेखील राबवला जात आहे.
याच अभियानाच्या शुभारंभासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आ. प्रकाश सोळुंके, आ. विक्रम काळे, आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीतीन रहमान, विभागीय वनाधिकारी अमोल गर्कळ, यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री अजित पवार, व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर जिल्हाभरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी बीडमधील हरित क्षेत्र वाढण्यासाठी सर्वांनी व्यापक प्रयत्न करावेत याकरिता प्रशासनाचा पाठपुरावा राहील आवश्यक त्या ठिकाणी राज्य शासनाकडून देखील मदत केली जाईल अशी आश्वासन दिले तसेच विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील केले.
यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी हरित बीड अभियानाची संकल्पना समजावून सांगत किंवा कोड नुसार वृक्ष लागवडीची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपडेट होत रा-हणार असल्याचे सांगितले. या स्तुत्य उपक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील घेत तसे प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाला प्रदान केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन विभागासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.