

केज: कारच्या नुकसानीचे आणि ऊसतोड मजुरांसाठी दिलेल्या पैशांचे कारण पुढे करून सतत तगादा लावत अपहरण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे घडली. जयदीप बालासाहेब माळी असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयदीप माळी हा १० ऑक्टोबर रोजी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी गावातील दत्ता सिताराम यादव यांची कार घेऊन गेला होता. परत येताना ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने कारचे नुकसान झाले. प्रतिष्ठित व्यक्तींच्या बैठकीत कार दुरुस्त करून देण्याचे ठरल्यानंतर जयदीपने ती बीड येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी लावली. दुरुस्तीसाठी ३५ हजार रुपये खर्च अपेक्षित असताना, कारमालकाने ती शोरूममध्ये नेऊन दुरुस्तीचा खर्च एक ते सव्वा लाख रुपये असल्याचे सांगत पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच ट्रॅक्टर ओढून नेण्याची धमकी देत त्याची दुचाकीही नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, जनार्धन नामदेव यादव आणि जयदीप ऊर्फ बंडू नामदेव यादव यांनी ऊसतोड मजूर मिळवून देण्यासाठी जयदीपला चार महिन्यांपूर्वी दोन लाख १५ हजार रुपये दिले होते. मात्र, मजूर कामावर गेले नसल्याने त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी पैशांची मागणी केली. दोन तासांत पैसे न दिल्यास बापलेकांना उचलून नेण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या सततच्या तगाद्यामुळे जयदीपने गावाजवळ नदीकाठी असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील बालासाहेब तुकाराम माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्ता यादव, जनार्धन यादव आणि जयदीप ऊर्फ बंडू यादव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.