

Jayant Patil demands government aid Flood affected
कडा : मराठवाडा व बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून सरकारने तातडीने ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केली.
आष्टी तालुक्यातील पावसाने प्रभावित भागाचा दौरा करताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील म्हणाले की, मराठवाडा, बीड तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर, ऊस यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई जाहीर करून दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष मदत द्यावी.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ५० हजार रुपये मदत मिळावी. जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ३० हजार, तर पशुधनाचे नुकसान झालेल्यांना ६० ते ७० हजार रुपयांची भरपाई द्यावी. ग्रामीण भागातील दुकानदारांचेही नुकसान झाले असून त्यांनाही मदत मिळणे आवश्यक आहे.
पाटील यांनी स्पष्ट केले की, सरकारकडे आर्थिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वीच मदत वितरित केली गेली पाहिजे. यासोबतच कर्जमाफीच्या मागणीसाठी येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी खासदार बजरंग सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, तसेच तालुक्यातील अधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.