

Heavy rains hit crops in 206 villages in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सलग चार ते पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरले आहे. जिल्ह्यातील तब्बल २०६ गावांतील पिके पूर्णपणे नष्ट झाली असून उर्वरित ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.
या आपत्तीमुळे जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांकडून शासनाकडे त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन सुखद वाटत असतानाच जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठा फटका दिला. आधी दुबार पेरणी, त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीने पिके सडून गेली.
त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे किडींचा प्रादुर्भाव आणि रोगराईचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. यामुळे उर्वरित पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली असून शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व महसुली मंडळात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्वरित पंचनामे करून शासन दरबारी अहवाल पाठवावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच दुबार पेरणीचे खर्च झालेले असताना आता पिक पूर्णपणे नष्ट झाल्याने कर्जफेडीचे संकट, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न यांसारख्या समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. शेतकरी म्हणतात की सरकारनं केवळ पंचनाम्यांवर वेळ घालवू नये, तर जलद गतीने प्रत्यक्ष मदत द्यावी. कारण पिकं गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती ना धान्य आहे ना पैसा; शेतीपुढे हात टेकण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाने वेळेत मदत करणे गरजेचे आहे. गौरी- गणपती सारखा सण अतिवृष्टीच्या संकटात गेला. किमान दसरा-दिवाळी तरी गोड जावी यासाठी शेतकरी शासनाकडे मदतीची अपेक्षा बाळगत आहेत.
चार दिवसांपासून पाऊस कोसळतोय. पेरणीसाठी कर्ज काढलं, खतं टाकली, कापूस छान उभा राहिला होता पण सगळं पाणीखाली गेलं. हातातलं पीक गेलं, तर घर चालवायचं कसं ? मुलांच्या शाळेची फी, बँकेचं हप्ते, घरखर्च - सगळं अडकलंय. सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई दिली नाही तर येणारे सणही आमच्यासाठी काळोखात जातील असे पीडित शेतकरी दादासाहेब पवार यांनी सांगितले.