

गोविंद खरटमोल अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील नेत्र विभागातील डॉक्टरांनी आपल्या कार्यातून देवत्वाची अनुभूती घडवून आणली आहे. येथील नेत्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे व सहयोगी डॉ. एकनाथ शेळके या जोडगोळीने एका २६ वर्षीय मातेस दोन्ही डोळ्यांवरील गुंतागुंतीचा मोतीबिंदू काढून तिची दृष्टी परत मिळवून दिली. दीड महिन्यांपासून आपल्या नवजात बाळाला पाहण्याची आस धरलेल्या मातेला अखेर आपल्या बाळाचे पहिले दर्शन घडले आणि हा क्षण उपस्थितांना भावुक करणारा ठरला.
कळंब येथील ही महिला गरोदर-पणातच दोन्ही डोळ्यांचा दृष्टीसंबंध गमावून बसली होती. वाढता मोतीबिंदू काचबिंदूत रूपांतरित होऊ लागल्याने प्रसूतीनंतर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र, प्रसूतीनंतरही ती आपल्या बाळाला पाह शकत नव्हती, कारण दोन्ही डोळ्यांवरील मोतीबिंदू प्रचंड वाढला होता.
या मातेस नवसंजीवनी देण्याचा निर्धार करत डॉ. दराडे व डॉ. शेळके यांनी ९ व १० सप्टेंबर रोजी तिच्या दोन्ही डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. १२ सप्टेंबर रोजी स्वा.रा.ती.चे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांच्या उपस्थितीत पट्टी काढण्यात आली.
दीड महिन्यानंतर बाळाचे पहिले दर्शन होताच मातेसह उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. या कार्यक्रमात डॉ. मृणाल जांभजाळ यांनी सूत्रसंचालन केले. स्थानिक पत्रकार व नेत्र विभागातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. दराडे यांनी सांगितले की, एवढ्या कमी वयात दोन्ही डोळ्यांना झालेला मोतीबिंदू आणि त्यावरील ही यशस्वी शस्त्रक्रिया ही अंबाजोगाईच्या वैद्यकीय इतिहासातील पहिलीच घटना आहे. दररोज २०-२५ नेत्रशस्त्रक्रिया होत असल्या तरी ही शस्त्रक्रिया वैद्यकीय दृष्ट्या वेगळी व अत्यंत आव्हानात्मक ठरली.