

Group education officer molested a minor girl
केज, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागातील एका प्रभारी गटशिक्षाधिकाऱ्या विरुद्ध बाला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे.
दि. १८ सप्टेंबर, गुरुवार रोजी सायंकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास एक मुलगी व महिला रस्त्याने जात असताना केज येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हा त्यांना नाष्टा व चहा पाणी करण्याच्या निमित्ताने त्याच्या चार चाकी गाडीत बसवून धारूर चौकातून चिंचपूरच्या मारुती मंदिराच्या रस्त्याने कोल्हेवाडीकडे घेऊन गेला.
कोल हेवाडीच्या रस्त्याच्या कडेला एका निर्जनस्थळी गाडी थांबवून गाडीमध्ये त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. यामुळे घाबरून जात त्या अल्पवयीन मुलीने व तिच्या सोबतच्या महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर त्या रस्त्याने मागून आलेल्या एका वाहनाच्या प्रकाशने घाबरून जात लक्ष्मण बेडसकर हा त्याची गाडी आणि मोबाईल तेथेच ठेवून पळून गेला.
या घटने नंतर दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट घेऊन हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि शिक्षण विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार त्यांना सांगितला. त्या नंतर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून दाखल अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.
सदर प्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या एका तासा पूर्वी लक्ष्मण बेडसकर आणि काही शिक्षक हे पोलिस ठाण्याच्या आवारात हजर होते. मात्र फिर्यादी पोलिस ठाण्यात आल्याचे समजताच सर्वांनी पोलिस ठाण्यातून पळ काढला. १५ जुलै रोजी एका खासगी शाळेच्या बसवर काम करणाऱ्या महिलेने याच प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती. परंतु नंतर मात्र त्या महिलेने घुमजाव केले होते.