

Give ST reservation to Banjara community; Meeting in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड, पुढारी वृत्तसेवाः हैदराबाद गॅझेट लागू करन बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी समाजबांधव एकवटले आहेत. सोमवारी बीडच्या सौभाग्य मंगल कार्यालयात व्यापक बैठक झाली. यावेळी १५ सप्टेंबर रोजी बीडमध्ये मोर्चा काढून ही मागणी प्रशासनाकडे केली जाणार असल्याचे ठरले.
बीडच्या सौभाग्य मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये समाजबांधवांनी मार्गदर्शन केले. आता लेकरांच्या भविष्यासाठी लढाई सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करत आरक्षण देण्याचे काम केले मात्र त्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाची एसटी प्रवर्ग म्हणून नोंद असून इतर राज्यात बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गाचा लाभ दिला जातो मग महाराष्ट्र सरकारकडून का नाही? असा सवाल करत जिल्ह्यातील बंजारा बांधकडून मोर्चाची पूर्व दिशा ठरविण्यासाठी भव्य बैठक घेण्यात आली. या बैठकीला व्यापक स्वरूप आल्याचे दिसून आले. पंधरा ते वीस हजार संख्येने जिल्ह्यातील बंजारा बांधव शहरातील सौभाग्य लॉन्स येथे उपस्थित राहिले.
मात्र जागा अपुरी पडल्याने रस्ता पूर्ण जाम झाला होता. बैठकीची कसलीही कल्पना प्रशासनास देण्यात आलेली नव्हती परंतु शहरात दाखल होणारे बंजारा बांधव पाहून पोलीस प्रशासन अलर्ट होत बंदोबस्त तैनात करण्यात आले. मात्र १५ ते २० हजाराने दाखल झालेल्या बांधवाकडून घेण्यात आलेल्या निर्णयात येत्या १५ सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरले असल्याचे निर्णय घेण्यात आले. शासनाकडून मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून न्याय देण्यात आले मग आमच्यावर अन्याय का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आले होते.
ते आरक्षण देण्याची मागणी करत बैठक पार पडली. यावेळी समाजातील अनेक तज्ञ मंडळींकडून समाजाला मार्गदर्शन करण्यात आले. ही बैठक समस्त बंजारा समाज या नावाखाली पार पडली. यावेळी आलेल्या समाज बांधवांना १५ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रा.पी.टी. चव्हाण, बी.एम. पवार, सेवानिवृत्त लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, संपत चव्हाण, अरुण पवार, रविकांत राठोड, अॅड. संगीता चव्हाण, ऍड. शरद चव्हाण, रामेश्वर पवार, अर्जुन चव्हाण, जगनाथ चव्हाण, अंकुश राठोड, सुरेश पवार, उद्योजक राम राठोड, उद्योजक राजेश राठोड यांच्यासह आदींनी मत व्यक्त केले. आ. विजयसिंह पंडितांनी दिला पाठिंबा मराठवाडा हा प्रदेश सन १९४८ पर्यंत निजाम शासीत हैदराबाद राज्याचा भाग होता, त्या काळातील हैद्राबाद गॅझेटियर १९२० मध्ये लांबडा / बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे.
बंजारा (लमाण) समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. ऐतिहासिकदृष्ट्या व प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये आहे. तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामिल झाल्यावर सन १९५६ नंतर या समाजाला ओबीसी / एनटीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. संघर्षयोध्दा श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाज बांधवांना दि.०२ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅझेटियर लागू केले. शासन स्तरावर हैद्राबाद गॅझेटियर अधिकृतपणे स्विकारले व अंमलात आले असल्यामुळे त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात सामिल करून त्यांना या प्रवर्गातील आर-क्षणाचा लाभ देण्याची मागणी करत जिल्ह्यातील बैठकीला तसेच मोर्चाला आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दिला.
एक तास ट्राफिक जाम
बीड शहरातील सौभाग्य लॉन्स येथे जिल्ह्यातील बंजारा बांधवांची आरक्षण लढाईच्या मोर्चा संदर्भात बैठक बोलवण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील बंजारा बांधव एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने शहरातील अंबिका चौक पांगरी रोड कॅनल रोड नगर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ट्राफिक एक तास जाम झाली होती. यावेळी तत्काळ पोलिस प्रशासनाकडून दखल घेत बैठकीनंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
१५ ते २० हजार लोकांची बैठकीला हजेरी
सोशल मीडियाच्या माध्यमातून आरक्षण लढाईची बैठक असल्याची कल्पना देण्यात आली होती. मात्र अन्यायची धग मोठी असल्याने जिल्ह्यातील समाज बांधव स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिला. त्यामुळे या बैठकीला एक सभेचे स्वरूप आले होते. किमान १५ ते २० हजार बांधव उपस्थित होते.