

गेवराई :“काय उपयोग तुमच्याकडच्या सोन्या-नाण्याचा, जेव्हा राहणार नाही एकही थेंब पाण्याचा!” हा संदेश केवळ भिंतीवर लिहिण्यापुरता मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष कृतीतून पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न गेवराई तालुक्यातील नव्या मळशी तांडा येथील शाळेत सुरू आहे.
पाणीटंचाईमुळे झाडे जगविण्याचे आव्हान उभे राहिले असतानाही शिक्षक उद्धव क्षीरसागर आणि स्वाती घोडके यांनी मातीच्या माठांचा अभिनव वापर करून वृक्षसंवर्धनाची धडपड सुरू ठेवली आहे. कमी पाण्यात झाडांच्या मुळांजवळ ओलावा टिकवून ठेवण्याच्या या प्रयोगातून पर्यावरण संवर्धनाचा नवा वस्तुपाठ विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.
शाळेवर रुजू झाल्यानंतर या शिक्षक दाम्पत्याने अध्यापनासोबतच शाळेच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला. शाळेच्या सखल भागाचे सपाटीकरण करण्यासाठी तब्बल ४० ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला. परिसर हिरवागार व्हावा, यासाठी वृक्षलागवडीची तयारी करून खड्डे खोदण्यात आले आणि विविध उंच वाढणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली. झाडांना नियमित पाणी मिळावे, यासाठी बोअरही घेण्यात आला.
सुरुवातीला बोअरला पाणी लागले; मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे तोही कोरडा पडला. त्यामुळे नव्याने लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा प्रश्न निर्माण झाला.झाडे वाळू नयेत म्हणून १० सप्टेंबरपासून पाण्याचे टँकर मागवून त्यांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, टँकरचा खर्च आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता, कमी पाण्यात झाडे कशी जगविता येतील, यावर शिक्षक दाम्पत्याने विचार केला.
त्यातूनच झाडांच्या बुडाशी मातीचे माठ ठेवण्याची कल्पना पुढे आली. माठातील पाणी हळूहळू झिरपल्याने मुळांच्या परिसरात ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी करून झाडांना आवश्यक ओलावा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
या उपक्रमाला गटशिक्षणाधिकारी मयूरजी मोदानी, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांचे सहकार्य लाभत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून झाडांना जगविण्याची ही धडपड म्हणजे पर्यावरण संवर्धनाची केवळ शिकवण नव्हे, तर ती कृतीतून रुजविणारा सुंदर उपक्रम आहे.
शाळेच्या परिसरात रुजतेय पर्यावरणाची शिकवण!
शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे ठिकाण नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पाण्याचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे संस्कारकेंद्रही आहे. नव्या मळशी तांडा शाळेतील हा उपक्रम त्याचेच उदाहरण ठरत आहे. पाण्याची टंचाई असतानाही झाडांचे संगोपन करण्यासाठी पर्याय शोधणे, उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पक वापर करणे आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखणे, हे धडे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळत आहेत.झाडे लावणे महत्त्वाचे असले, तरी ती जगविणे ही त्याहून मोठी जबाबदारी आहे. ही जाणीव ठेवून शिक्षक दाम्पत्याने वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून शाळेचा परिसर हिरवागार होण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था निर्माण होण्यास हातभार लागत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षसंवर्धन यांची सांगड घालणारा हा प्रयोग अन्य शाळेसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.