

बीड : वडवणी तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे यांच्या शिक्षणासाठी कुटुंबीयांनी घेतलेल्या कर्जाचा भार त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतरही कुटुंबीयांच्या डोक्यावर कायम होता. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी फलटण येथे डॉ. संपदा मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूचे दुःख आणि त्यानंतर शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मुंडे कुटुंबीयांच्या मदतीला आता साहित्यिक विश्वास पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार धावून आला आहे. पाटील यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने डॉ. संपदा यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम बँकेत जमा करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
या मदतीबद्दल मुंडे कुटुंबीयांनी विश्वास पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे पत्राद्वारे आभार मानले आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी कर्ज काढले होते. मात्र, संपदा यांच्या अकाली आणि संशयास्पद मृत्यूनंतर हे कर्ज कसे फेडायचे, असा गंभीर प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला होता.
अशा कठीण परिस्थितीत पाटील यांनी पुढाकार घेत कुटुंबावरील आर्थिक ओझे कमी केले.डॉ. संपदा मुंडे या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या होत्या. त्यांच्या शिक्षणासाठी कुटुंबीयांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मुलीने डॉक्टर होऊन कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले; मात्र तिच्या मृत्यूनंतर तिच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज कुटुंबीयांसाठी वेदनादायी आठवण ठरले होते.
एकीकडे मुलीच्या मृत्यूच्या न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष आणि दुसरीकडे कर्जफेडीची चिंता, अशा परिस्थितीत विश्वास पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराने केलेली आर्थिक मदत मुंडे कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरली आहे. कर्जाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर कुटुंबीयांनी पत्राद्वारे त्यांचे ऋण व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला गती देऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून सुनावणी जलदगतीने होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी लक्ष्मण मुंडे यांनी केली आहे.एका मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी कुटुंबीयांनी घेतलेले कर्ज, तिचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर कर्जफेडीसाठी समाजातून पुढे आलेला मदतीचा हात, या संपूर्ण प्रकरणाने संवेदनशीलतेला नवी किनार दिली आहे. मात्र, आर्थिक मदतीने कुटुंबावरील एक ओझे दूर झाले असले, तरी संपदा यांच्या मृत्यूमागील सत्य समोर येऊन कुटुंबाला न्याय कधी मिळणार?, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
‘फास्टट्रॅक’चे आश्वासन; प्रत्यक्षात सुनावणीला विलंब
दरम्यान, डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूचे प्रकरण अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रकरणाच्या सुनावणीला अपेक्षित वेग मिळत नसल्याची खंत संपदा यांचे भाऊ लक्ष्मण मुंडे यांनी व्यक्त केली आहे.संपदाच्या मृत्यूला इतका काळ उलटूनही प्रकरणाच्या सुनावणीला विलंब होत आहे. फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तशी कार्यवाही होताना दिसत नाही,” अशी खंत लक्ष्मण मुंडे यांनी व्यक्त केली.