

गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा व तलवडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 2 लाख 66 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरसदेवी येथे गांजाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तलवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने सिरसदेवी येथे धाड टाकली.
या वेळी शेख रईस शेख युसूफ (वय 25, रा. सिरसदेवी) याच्या घराची झडती घेतली असता 8 किलो 888 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 2,66,640 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पथकात नायब तहसीलदार गजानन मोरे, सपोनि संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, तसेच पोलीस हवालदार आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, अतुल हराळे, सुधीर जोशी आणि तलवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. अवैध गांजा विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांचा वचक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.