

गेवराई – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवती टॉकीजसमोर शुक्रवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नगराध्यक्ष पदासाठी गीता बाळराजे पवार आणि सर्व प्रभागातील भाजप समर्थित नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली होती. या सभेला पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले.
सभेला खासदार प्रितमताई मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, माजी मंत्री बदामराव पंडित, युध्दाजीत पंडित, यशराज पंडित, शिवराज पवार, गिरीका पंडित, प्रा. पी. टी. चव्हाण तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज दादा पवार यांनी केले.
आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या की, “नावातच पवित्रता असलेली गीता, अशा गीता पवार यांना नगराध्यक्ष करा. गेवराईकरांनी यावेळी भाजपवर पूर्ण विश्वास टाकावा.”
त्या पुढे म्हणाल्या, “दोन तारखेपर्यंत घड्याळ कपाटात ठेवा आणि कमळावर मतदान करा.” त्यांच्या या वक्तव्याने वातावरणात उत्साहाचे वारे वाहू लागले.
युतीबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “आमदारकीसाठी मी नेहमीच युतीचा धर्म पाळला आहे. बदामराव पंडित आणि बाळराजे पवार एकत्र येत असल्याने गेवराई तालुक्याचा विकास वेगाने होईल. पवार घराणे गेली दहा वर्षे आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”
नगरपरिषदेसंबंधीच्या नियोजनावर बोलताना त्यांनी सांगितले,
“नगर परिषदेमध्ये लोकाभिमुख कामकाज व्हायला हवे. नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबार घ्यावा. मी स्वतः तीन महिन्यांतून एकदा नगरपरिषदेची भेट देणार आहे.”
महिला सबलीकरणावर भर देताना त्या म्हणाल्या,
“आमची सत्ता आली नाही तर येथे कलियुग; पण आमची सत्ता आली तर रामयुग येईल. मला मान-पानाची इच्छा नाही, मला फक्त जनतेची सेवा करायची आहे. माझी भूमिका तुळशीच्या पानासारखी नि:स्वार्थ आहे.”
सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती जाणवली. दहा वॉर्डांमधील कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. एकंदरीत, पंकजा मुंडे यांच्या प्रभावी भाषणाने आणि शक्तीप्रदर्शनाने भाजपच्या नगरपरिषद निवडणूक प्रचाराला नव्याने जोम मिळाल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.