

गेवराई: गेवराई तालुक्यातील सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून याचा थेट परिणाम आता बाजारपेठांवर दिसू लागला आहे. विशेषत: बहुगुणी औषधी मानला जाणारा शेवगा गेवराईच्या भाजी मंडईतून अक्षरशः गायब झाला आहे. मिळाल्यास फक्त नावालाच दिसणारा शेवगा प्रतिकिलो तब्बल चारशे रुपये या आकाशाला भिडलेल्या दराने विकला जात आहे.
शेवगा हा रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असून पौष्टिक, औषधी व आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे त्याला बाजारात कायम मागणी असते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी, कीडरोगाची वाढ आणि शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान या तिहेरी फटक्यामुळे शेवग्याचे उत्पादन कोसळले आहे.
बाजारातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ग्रामीण भागातून आता शेवगा येणे पूर्णपणे बंद झाले आहे. “आठवडाभरात क्वचितच एखादा कॅरेट मिळतो. मागणी जास्त असल्याने दर आपोआप वाढत चालले आहेत,” असे भाजी विक्रेत्या नागेश नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, भाजी मंडईतील ग्राहक मात्र प्रचंड अडचणीत सापडले आहेत. रोजच्या जेवणातील सोबती आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेला हा भाजीपाला आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. “शेवगा खरेदी करायला गेलं की जणू सोनं विकत घेतोय असं वाटतं,” अशी प्रतिक्रिया निलम वळवी गृहिणीने दिली.
शेतकरी वर्गातही चिंता वाढली असून उत्पादन पुन्हा सुरळीत होण्यासाठी हंगामी स्थिती सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यात वातावरण स्थिर राहिल्यास बाजारात शेवग्याचा पुरवठा वाढेल आणि दर काही प्रमाणात कमी होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, अतिवृष्टीचा थेट फटका गेवराईच्या भाजी मंडईवर बसला असून बहुगुणी औषधी शेवगा सर्वसामान्यांच्या ताटातून जवळजवळ गायबच झाला आहे. शेवगा हा बहुगुणी वनौषधी आहे आम्ही घरी मुलांना शेवगा च सूप देतो या मुळे रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते परंतु भाव वाढले असल्याने शेवगा घेण परवडत नाही अशी प्रतिक्रीया दक्षा वानखेडे या गृहिणीने दिली.