Beed News : तरुणाने स्वखर्चातून बुजवले धारूर घाटातील खड्डे

वारंवार घडत होत्या अपघाताच्या घटना; प्रशासनाचे होते दुर्लक्ष
Dharur Ghat Road Potholes
तरुणाने स्वखर्चातून बुजवले धारूर घाटातील खड्डेpudhari photo
Published on
Updated on

धारूर ः धारूर घाटातील वळण रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चोरांबा येथील गंगाराम मुळे या जागरूक तरुणाने सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना चांगलाच आरसा दाखविला आहे. या तरुणाच्या कार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक केले जात आहे.

धारूर घाटातील वाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या, चारचाकी वाहने आपटण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या धोकादायक परिस्थितीबाबत नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तक्रारी आणि मागण्या केल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Dharur Ghat Road Potholes
US-Iran war | सैद्धांतिक भ्रमांचे सावट युद्धबंदीवर

अशा परिस्थितीत चोरांबा येथील गंगाराम मुळे या तरुणाने पुढाकार घेत स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जेसीबी यंत्र मागविले. त्यानंतर घाटातील धोकादायक खड्ड्यांमध्ये माती व मुरूम टाकून ते बुजविण्याचे काम हाती घेतले. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केवळ अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांचे जीव वाचावेत या उद्देशाने त्याने हे कार्य केल्याचे समोर आले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. सरकारला विनंती करून करून आम्ही त्रस्त झालो, पण रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे अखेर स्वतःच हे काम करावे लागले. मी कोणताही गुत्तेदार नाही; मात्र लोकांचे जीव वाचविणे अधिक महत्त्वाचे वाटले, असे तो सांगताना दिसत आहे.

या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांकडे वेळेत लक्ष दिले जात नसल्याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. शासनाच्या विविध यंत्रणा अस्तित्वात असताना सामान्य नागरिकांना स्वतःच्या पैशातून सार्वजनिक कामे करावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Dharur Ghat Road Potholes
US Iran Airstrikes | अमेरिका-इराणमध्ये पुन्हा हवाई हल्ले
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी संबंधित तरुणाचे कौतुक केले आहे. केवळ भाषणे न देता लोकप्रतिनिधींनी अशा सामाजिक भान असलेल्या तरुणांकडून प्रेरणा घ्यावी, अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त केल्या जात आहेत. धारूर घाटातील वळण रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news