

Gajanan Maharaj's palanquin welcomed with enthusiasm in Beed
गेवराई / परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवाः विदर्भातील शेगाव येथून सुरू झालेला संत गजानन महाराज आषाढी पायी वारी दिंडी सोहळा गुरुवारी परळी वैजनाथ येथील शक्तीकुंज वसाहतीत मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने दाखल झाला. यावेळी बारीत सहभागी झालेल्या शेकडो वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात, अभंगाच्या सुरात आणि जयघोषात परळीच्या वेशीवर आल्यानंतर शक्तीकुंज परिसरात मुक्काम घेतला. तर दुसरीकडे मुक्ताईनगर येथून पंढरीकडे निघालेली संत मुक्ताईंची पालखी गेवराई शहरात पोहचली. दोन्ही पालख्या जिल्ह्यात दाखल झाल्याने विठुनामाचा गजर होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज पालखीचा परळीत दोन दिवस मुक्काम असून, या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शक्तीकुंज वसाहतीत वारकऱ्यांचे स्वागत परळीकरांच्या वतीने जल्लोषात करण्यात आले.
पालखीच्या स्वागतासाठी शहरातील विविध मंडळे, संस्था आणि नागरिकांनी पुष्पवृष्टी, फुलांच्या रांगोळ्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत केले. पालखीचा मुक्काम शक्तीकुंज वसाहतीत असून, शुक्रवारी सकाळी (दि. २० जून) पालखी परळी शहरात येणार आहे.
यानंतर संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम परळीतील संत जगमित्रनागा मंदिरात होणार आहे. भाविक आणि स्थानिक नागरिकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण परिसर विठ्ठलमय झालेला आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची संख्या दरवर्षीप्रमाणेच मोठी असून, परळी शहरात आगमन होताच दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली.
परळी तालुक्यात वारीच्या मार्गावर गावोगावी नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी, संतूरवादक, फराळ आदी सेवाकार्य केले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणाही सतर्क असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पालखी परवा, २१ जून रोजी परळीतून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. या दिंडींचे परळीवासीयांनी दरवर्षीप्रमाणे जोरदार स्वागत केले. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. संपूर्ण परळी शहर सध्या भक्तिमय वातावरणात न्हालेले आहे.