

Former MLA Sunil Dhande joins Shiv Sena
बीड, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे जुने मित्र विद्यमान मंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. बीडच्या शिवसेनेमध्ये आधीच दोन गट असल्याचे चर्चा होत असताना आता धांडे यांच्या रूपाने तिसरा गट समोर आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सुनील धडे यांनी वेगवेगळ्या पक्षातील आपला प्रवास कायम ठेवला आहे. शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि आता पुन्हा एकदा शिंदे यांचे नेतृत्व ाखाली नव्या सेनेत त्यांनी प्रवेश केलाय.
मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यास सुनील धांडे यांचे निवडक समर्थक उपस्थित होते. लवकरच आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये विराट मेळावा घेतला जाणार आहे.
सुनील धांडे यांच्या शिवसेना प्रवेशाने बीड जिल्ह्यात शिवसेनेचे बळ नक्कीच वाढले असले तरी बीड जिल्ह्यातील विद्यमान तीन शिवसेनाप्रमुख तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील बाजीराव चव्हाण असे दोन गट असताना आता आमदार सुनील धांडे यांच्या रूपाने तिसरा एक गट शिवसेनेत सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
आता हे तिन्ही गट मिळून कशा पद्धतीने समन्वयाने काम करतात आणि बीड जिल्ह्यातील शिवसेनेला कशा पद्धतीने बळकटी देतात याबाबतची उत्सुकता राजकीय जाणकारांना लागली आहे.