

50 percent of Kharif sowing completed in Kage taluka
केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ५०% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसावर आणि रोहिणी नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या भरोशावर केलेल्या पेरणीतील पिके जोमात आहेत.
केज तालुक्यात केज, होळ, युसुफवडगाव, बनसारोळा, विडा, नांदूरघाट, हनुमंत पिंपरी, चिंचोली माळी आणि मस्साजोग ही सहा महसूल मंडळे आहेत. या सहा महसूल मंडळात एकूण १३५ गावांचा समावेश आहे. १३५ गावांचे १ लाख १४ हजार ८४६ हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळ असून त्या पैकी १ लाख ५ हजार ११२ हेक्टर क्षेत्र हे खरिपासाठी पेरणी योग्य क्षेत्र आहे.
या वर्षी सुद्धा सर्वात जास्त पेरणी योग्य क्षेत्रा पैकी सर्वात जास्त क्षेत्रावर निव्वळ सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे. तर त्या खालोखाल नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. त्या नंतर पिवळी, बाजरी व मका आणि तृणधान्य यासह तूर, मूग व उडीद ही कडधान्य व गळीताची पिके याची अल्प क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
या वर्षीच्या खरीप हंगामात लवकर पेरणी झालेली पिके जोमात आहेत. तर उशिरा पेरणी झालेली पिके उगवू लागली आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. शेतकरी आता बैलाऐवजी ट्रॅक्टरच्या पेरणीला पसंती देत आहेत. त्याने वेळ आणि पैशाची देखील बचत होत आहे.