

Former MLA Dhonde to join NCP
कडा, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार भीमराव धोंडे आता नव्या राजकीय वाटेवर! येत्या ११ नोव्हेंबर रोजी मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत धोंडे हे आपल्या ५०० प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याची बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चा रंगली असून, यामुळे राजकीय समीकरणांत मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी आ. भीमराव धोंडे हे गेली चार दशके सक्रिय राजकारणात आहेत. समाजकारण आणि विकास यांची सांगड घालणारे, शांत, शिस्तप्रिय आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले असून, अनेक शैक्षणिक संस्था, कृषी महाविद्यालय, आरोग्य से वेसाठी रुग्णालये, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे व व्यायामशाळा त्यांनी उभारल्या. साखर कारखाना सुरू करण्याच्या संघर्षातूनही त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली नाही, उलट कार्यकर्त्यांचा पाठिंबा अधिकच वाढला. धोंडे यांनी पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, ना. अजितदादा पवार हे राज्यातील विकासदृष्टी असलेले धडाडीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वातून बीड जिल्हा व मतदारसंघाला नवे बळ मिळेल. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचे कार्य या माध्यमातून साध्य होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमधून निलंबनानंतर नवा अध्याय
भाजपमधून निलंबन झाल्यानंतर धोंडे यांनी पुन्हा पक्षप्रवेशाचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभेत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने आ. सुरेश धस यांनी त्यास विरोध नोंदविला. पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांनंतरही वरिष्ठ स्तरावरून मार्ग निघाला नाही. अखेर त्यांनी सत्ताधारी पक्षात म्हणजेच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला, आणि त्यासाठी ११ नोव्हेंबरचा शुभमुहूर्त ठरला आहे.
राजकीय समीकरणे बदलणार!
माजी आ. भीमराव धोंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे आष्टी, पाटोदा, शिरूर कासार मतदारसंघात नवे राजकीय उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत. धोंडे यांचे संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व सत्ताधारी पक्षाशी जोडल्याने आगामी निवडणुकांत परिणाम दिसून येणार हे निश्चित मानले जात आहे.