Girls Birth Rate : बीड जिल्ह्यात पुन्हा मुलीचा जन्मदर घटला

गर्भलिंग निदानासारखे प्रकार रोखण्यासाठी उपाय गरजेचे
Girls Birth Rate
मुलींचा जन्मदरpudhari file photo
Published on
Updated on

Female Birth Rate Drops Again in Beed District

उदय नागरगोजे

बीड : स्त्री भ्रूणहत्येमुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा स्त्री जन्मदराचा आलेख घटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीतील शासकीय व नोंदणीकृत रुग्णालयात एक हजार मुलांमागे जन्मलेल्या मुलींची संख्या ९३७ वरून ८६१ पर्यंत पोहोचली. यामागची कारणे शोधण्याबरोबरच गर्भलिंग निदानासारखे गंभीर प्रकार होत असतील तर ते रोखण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Girls Birth Rate
बीड जिल्ह्यात श्वानदंशाच्या वाढत्या घटना चिंताजनक

बीड जिल्ह्यात पंधरा वर्षांपूर्वी स्त्रीभ्रूणहत्येसारखे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतरपासून बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अलर्ट मोडवर काम केल्याने स्त्री जन्मदर हळूहळू वाढत होता. यामध्ये सोनोग्राफी सेंटर्ससाठी विविध नियम घालून देण्यात आले होते, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात होती.

यानंतर आलेल्या कोरोना महामारी, लॉकडाऊन कालावधीतदेखील बीडमधील स्त्री जन्मदर ९३७ पर्यंत पोहचला होता. स्त्रीभ्रूणहत्या गर्भलिंगनिदान यामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्याला ही आकडेवारी नक्कीच सुखावणारी होती. हा जन्मदर प्रतिवर्षी घटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Girls Birth Rate
Beed District Hospital : जिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी

आकडेवारीचा विचार केला तर २०२१-२२ मध्ये एक हजार मुलांमागे ९३७मुली जन्मल्या, २०२२-२३ मध्ये एक हजार मुलांमागे ९२९ मुली जन्मल्या, २०२३-२४ मध्ये मात्र हा आकडा एकदम ८९६ वर पोहचला, २०२४-२५ मध्ये आणखी कमी होत ८६१ वर आला. आता सुरू असलेल्या २०२५-२६ मध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत हा आकडा ८६१ पर्यंत खाली आला आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालय तसेच नोंदणीकृत रुग्णालयात जन्मलेल्या संख्येनुसार आरोग्य विभागाने दिलेली आहे.

आरोग्य विभागाकडून कार्यशाळा

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) या कायद्याविषयी जनजागृती व्हावी, अंमलबजावणीबाबत आशा स्वयंसेवीका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम करावे यासाठी गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून कार्यशाळा घेतल्या जात आहेत. अशाच पद्धतीने व्यापक मोहीम हाती घेण्याची मागणी आता होत आहे.

लॉकडाऊननंतर उच्चांकी जन्मदर

२०२० मध्ये कोरोना संसर्गाचा धोका असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या कालावधीत अगदी घराबाहेर पडण्यासही लोक घाबरत होते. त्यानंतर म्हणजेच २०२१-२२ मध्ये एक हजार मुलांमागे तब्बल ९३७ मुली जन्मल्या होत्या. हा योगायोग आहे किंवा आणखी काही याचाही शोध घ्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news