

Complicated delivery successful at district hospital
बीड, पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा रुग्णालयात आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेचे सिझर करुन प्रसूती करण्यात आली. या महिलेला दोन जुळ्या मुली जन्मल्यानंतर त्यातील एका मुलीच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. यानंतर तज्ञांकडून या मुलीची तपासणी केल्यानंतर तिला मुंबईला पाठवण्याची व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी केली. यामुळे त्या मुलीवर देखील यशस्वी शस्त्रक्रिया होऊ शकली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
बीड येथील जिल्हा रूग्णालयात दि.६ ऑक्टोबर रोजी महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. आठ महिन्याची गर्भवती असतांनाच सिझर करून प्रसुती करावी लागली. महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यापैकी एक २.३ कि. ग्रॅम तर एक मुलगी १.८ कि. ग्रॅम वजनाची झाली. मात्र १.८ कि. ग्रॅम वजन असलेल्या मुलीच्या हृदयात दोन ते तीन छिद्र होते हा आजार झाल्याचे निदान जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी केले.
त्याचबरोबर त्या मुलीच्या हृदयातील नसा देखील फिरलेल्या म्हणजेच जागा बदललेल्या आढळून आल्या. त्यामुळे त्या नवजात मुलीस एनआयसीयु कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही तासातच तिचे टूडी-ईको करण्यात आले. पॅराडॉईज हॉस्पीटलचे डॉ. सिद्दीक आणि अॅपेक्स हॉस्पीटलचे डॉ. इजहार जावेद यांच्या सल्ल्यानुसार मुलीला मुंबईला दाखल करण्याचे निश्चित करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी तात्काळ १०८ रूग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि पुढे इतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून त्या त्या जिल्ह्याच्या हद्दीवर १०८ रूग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सुचना केल्या. दि.७ ऑक्टोबर रोजी नवजात मुलीला मुंबईला शिफ्ट करण्यात आले. जिल्हा हद्दीची मर्यादा असल्याने बीड ते मुंबईपर्यंत तब्बल ५ अॅम्बुलन्स बदलाव्या लागल्या, ८ ऑक्टोबर रोजी मुलीला मुंबईतील नारायणा हेल्थ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील विभाग प्रमुख डॉ. सुप्रतिम सेन यांनी फोन वरून डॉ. इलियास खान आणि डॉ. सिद्दीक यांच्याशी चर्चा केली. हृदयाची मुख्य शस्त्रक्रिया करून पुढील दुसरी शस्त्रक्रिया बाळाचे वजन वाढल्यानंतर करण्याबाबत डॉक्टरांचे एक मत झाले.
त्यानुसार मुलीवर ही हृदयाची गुंतागुंतीची शखक्रिया करण्यात आली. त्यासाठी साथ-ारण १ लाख ६५ हजारांचा खर्च अपेक्षित होता. मात्र योजना आणि हॉस्पीटल एनज-ओ मुळे मोमीन यांना १ लाखाची सवलत मिळाली. ७० हजार रूपयांत त्यांच्या बाळाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एक हृदय शस्त्रक्रिया झाली असून दुसरी शस्त्रक्रिया दिड महिन्यानंतर करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून बाळ सुखरूप आहे. दरम्यान जिल्हा रूग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे निदान होऊन त्यावरील हृदयाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अतिगंभीर रूग्ण असल्याने आणि त्यांना कागदपत्रांची आवश्यकता असल्याने महसूल विभागातील नायब तहसीलदार हजारे, जिल्हा रूग्णालयातील जन्म प्रमाणपत्र नोंदणी विभागाने काहीच तासाच ही सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली. त्यामुळे हृदयाचा गंभीर आजार असलेल्या एका दिवसाच्या मुलीला जीवदान मिळाले.