

Dr. Sampada Munde Death Case Bandh today in Vadwani, call for Rasta Roko movement
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा श्रीकिसन मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी जिल्हाभरातून संतापाची लाट उसळली आहे. कर्तव्यनिष्ठ, सेवाभावी आणि प्रामाणिक डॉक्टर असलेल्या डॉ. मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याच निषेधार्थ उद्या, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी बडवणी शहर बंद आणि रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले असून, सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी एकजुटीने यात सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणी वडवणी तालुक्यातील ग्रामस्थ, कोठारबन गावचे नागरिक आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी तहसीलदार व वडवणी पोलिसांना निवेदन सादर केले. त्यात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. संपदा मुंडे या दोन वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे त्या रुग्ण आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. मात्र, काही प्रभावशाली व्यक्ती व पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर सतत दबाव आणि मानसिक छळ केला जात असल्याचे आरोप आहेत.
विशेष म्हणजे, डॉ. मुंडे यांनी स्वतःच १९ जून २०२५ रोजी फलटण उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन या त्रासाविषयी सविस्तर माहिती दिली होती. त्या तक्रारीत काही पोलिस अधिकारी आणि संबंधित व्यक्तींची नावे नमूद करून मानसिक छळाचे स्वरूप स्पष्ट केले होते. परंतु, त्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. उलट, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनीच डॉ. मुंडे यांची चौकशी करून त्यांच्यावरच उत्तर मागवले, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या सर्व घटनाक्रमामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या मते, जर तक्रारीची योग्य दखल घेतली असती, तर कदाचित आज ही शोकांतिका घडली नसती. त्यामुळे आता स्वतंत्र विशेष तपास पथक () नेमून निष्पक्ष, सखोल आणि वेळेत चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित पोलिस अधिकारी व जबाबदारांवर कठोर कारवाई करून उदाहरण घालावे, असा ठाम सूर नागरिकांनी लावला आहे.
या पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबर रोजी वडवणी शहर संपूर्ण बंद ठेवण्यात येणार असून, सकाळी नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्ते शांततेत रास्तारोको आंदोलन करणार आहेत. "न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील" असा इशारा देत आयोजकांनी हे आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडेल, असे स्पष्ट केले आहे. डॉ. संपदा मुंडे या केवळ एक डॉक्टर नव्हत्या, तर ग्रामीण भागात निःस्वार्थ सेवाभावाने कार्य करणाऱ्या एक तरुण महिला अधिकारी होत्या. त्यांच्या मृत्यूने शासनयंत्रणेतील संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावोगावी, रुग्णालयांत, आणि सोशल मीडियावरून "संपदाला न्याय मिळालाच पाहिजे" अशी हाक उमटत आहे.