

केज : माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या मॅनेजरने इंधन विक्रीचे ११ लाख ४३ हजार बँकेत जमा न करता ते पैसे घेवून पोबारा केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून मॅनेजर आकाश पाखरे याच्या विरूद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed News)
याबाबत अधिक माहिती अशी की, केजच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे यांचे पती आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या मालकीचा केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर मस्साजोग येथे शुभद्रा पेट्रोलियम नावाने इंडियन ऑइल पंप आहे. या पंपावर मॅनेजर म्हणून आकाश बालासाहेब पाखरे (रा.आपेगाव, ता. अंबाजोगाई) आणि इतर तिघे कामगार मागील दोन वर्षांपासून काम करीत आहेत. इंधन विक्रीचे जमा झालेले पैसे मॅनेजर आकाश पाखरे हा दररोज बँकेत जमा करीत असे. (Beed News)
दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांपासून पेट्रोल पंप बंद असल्याचे समजताच डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांनी पेट्रोल पंपावर जाऊन माहिती घेतली असता तेथील मॅनेजर आकाश पाखरे याचा मोबाईल बंद असल्याने चौकशी केली असता पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्यात इंधन नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दुसरा नोकर विशाल भालेराव याने सांगितले की, पेट्रोल व डिझेलचे विक्रीतून मिळालेले एकूण ११ लाख ४३ हजार ५७० रुपये घेऊन मॅनेजर आकाश पाखरे हा फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन करीत आहेत.
हा पेट्रोल पंप कंपनीशी ऑनलाईन पद्धतीने जोडला असल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून इंधन विक्री बंद असल्याचे कंपनीला जाणवतच ५ ऑगस्टरोजी डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांना इंडियन ऑईल कंपनी सेल्स ऑफीसर अमीत बोडसे यांनी फोन करून माहिती दिली. त्यामुळे या अफरातफरीचा प्रकार उघडकीस आला.