

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रा मंगळवारी येणार असून त्यासाठी कार्यक्रम स्थळी विज चोरून घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला परवानगी न घेताच वीज वापर होत असल्यामुळे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मागील अनेक दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा महाराष्ट्रभर फिरून मंगळवारी बीड जिल्ह्यात येत आहे. सकाळी ११ वाजता माजलगाव येथील मंगलनाथ मैदाना मध्ये या यात्रेनिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभास्थळी मागील चार दिवसापासून भव्य अशा मंडपाची उभारणीचे काम सुरू आहे. तेव्हापासून जवळच असलेल्या एका रोहीबावरून डायरेक्ट आकडे टाकून विजेचा वापर सुरू आहे. यासाठी संबंधित मंडप उभारणी वाल्यांनी वीज वितरण कंपनीकडून यासाठी कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आकडे तसेच दिसून येत होते.
तीन दिवसांपूर्वी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन विचारणा केली असता आम्ही जनरेटर लावून असल्याचे सांगितले होते. परंतु ३-४ दिवसांपासून या ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करण्यात येत आहे. असा प्रकार कोणी सर्वसामान्यांनी केला असता तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली असती. परंतु हा प्रकार वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना माहीत असताना देखील त्यांनी अद्याप कारवाई केली नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची वीज चोरीसाठी मुकसंमती तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.
या जनसन्मान यात्रेसाठी शहरात जागोजागी होडींग्ज लावण्यात आले आहेत. यामुळे शहराचे विद्रोपीकरण पाहावयास मिळत होते. न्यायालयाने कोठेही होर्डिंग्ज लावण्यास मनाई केलेली असताना व नगरपालिकेची कसल्याच प्रकारची परवानगी न घेता हे होडींग्ज लावले असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परवानगीची आवश्यकता नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात होणाऱ्या सभेसाठी वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या मीटरसाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी आम्ही जाऊन पाहणी केली असता डीपीवरून फक्त फोकससाठी लाईट घेण्यात आली होती. कार्यक्रमावेळी जनरेटरचा वापर करणार असल्याचे या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते.
कल्पना सांगोलकर, कनिष्ठ अभियंता, बीज वितरण कंपनी
माजलगाव शहर कार्यक्रम स्थळी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराने काय केले याबाबत माहिती नाही.
जयदत्त नरवडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)