

Due to unseasonal rains that have continued for a week, agricultural work has been incomplete np88
नेकनूर : मनोज गव्हाणे
आठवडाभरापासून अवकाळी पावसाची नित्याने हजेरी असल्याने उन्हाळ्यातील पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. अनेक ठिकाणी नांगरट बाकी असून एक ते दोन दिवस बरसणारा अवकाळी आठवड्यापेक्षा जास्त दिवस मुक्कामी असल्याने वेळेवर पेरणी कशी होईल या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
मे महिन्यात एखादा अवकाळी पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी आवश्यक असतो. जेणेकरून शेतातील नांगरट मोकळी होऊन मोगडा , पाळी, तण वेचणी ही कामे उरकून पेरणीसाठी शेती सज्ज होते, मात्र यावर्षी मे महिण्याच्या पहिल्या आठवड्यातच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आठवडाभरापासून रोजच अवकाळी पाऊस कोसळत असल्याने नांगरटीसहित अनेक ठिकाणी शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळते.
अजून अवकाळी पाउस 30 मे पर्यंत मुक्कामी असल्याचे सांगितले जात असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्रात पेरणीसाठी शेती तयार होईल का? हा प्रश्न सतावत आहे. आता मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या अवकाळी पावसाने पावसाळ्यात पाऊस लांबणार तर नाही ना हा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
अवकाळी पावसामुळे मे च्या पाणीटंचाई, उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी उन्हाळ्यात असणाऱ्या लग्नसमारंभ इतर कार्यक्रमाला अवकाळीचा फटका बसला आहे. आठवड्यात नित्याने अवकाळीची हजेरी पावसाळ्यात वेळेवर बरसण्यासाठी पोषक ठरणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.