

Due to the neglect of the archaeology department, the Mahadurg fort of Dharur is in danger.
अतुल शिनगारे
धारूर : धारूर शहराच्या वैभवाची आणि शौर्यगाथेची साक्ष देणारा ऐतिहासिक महादुर्ग किल्ला आज पुरा-तत्त्व विभागाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे अक्षरशः विदारक अवस्थेत पोहोचला आहे. किल्ल्याच्या बुरुजांवर काटेरी झाडे, लाल वेली, गाजरगवत आणि वेड्या बाभळीने अक्षरशः ताबा घेतला असून, हा ऐतिहासिक ठेवा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ला परिसरात अनेक दिवसांपासून पडलेल्या भिंतींची दुरुस्ती न झाल्याने परिसर अधिकच अस्वच्छ झाला आहे. दगडी भिंती कोसळलेल्या अवस्थेत असताना प्रशासनाची उदासीनता ही इतिहासाशी केलेली थट्टाच असल्याचा संतप्त आरोप किल्ला प्रेमींनी केला आहे.
बुरुजांना तडे; किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका विशेष म्हणजे किल्ल्याच्या धारूर : येथील महादुर्ग किल्ल्याच्या भिंतींवर वृक्ष व वेली उगवल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. बुरुजांवर उगवलेली लहान-मोठी झाडे दगडी बांधकामात मुळे खोलवर घुसवत असून, त्यामुळे भिंतींना तडे जात आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली, तर भविष्यात संपूर्ण बुरुज कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. मात्र, हे सर्व उघडपणे दिसत असतानाही संबंधित पुरातत्त्व विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
महादुर्ग किल्ला हा धारूर शहराची ओळख आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून विद्यार्थी, इतिहास अभ्यासक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. मात्र, काटेरी झुडपे, अस्वच्छता, पडलेल्या भिंती आणि दुर्लक्षित बुरुज पाहून पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
किल्ल्याच्या गतवैभवाचा अक्षरशः रास होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्थानिक नागरिक व किल्ला प्रेमींनी पुरातत्त्व विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. इतके मोठे ऐतिहासिक वैभव धारूरला लाभले असताना त्याची योग्य देखभाल न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशी प्रतिक्रिया किल्ला प्रेमी व्यक्त करत आहेत.
प्रशासन जागं होणार की इतिहास नामशेष होणार?
महादुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन काम सुरू करावे, अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुरातत्त्व विभागाचे हे अक्षम्य दुर्लक्ष थांबणार कधी? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.