

Drought snatched away the tomato crop. 4 to 5 lakh loss farmer in tention
गौतम बचुटे
केज : रानात हिरवीगार झालेली टमाट्याची बाग... वेलीला लगडणारी फळे... आणि त्यातून चार पैसे हातात येतील, लेकराबाळांचे चेहरे आनंदाने फुलतील, संसाराला थोडा हातभार लागेल, अशी स्वप्ने डोळ्यांत साठवलेला शेतकरी. मात्र, निसर्गाने ऐनवेळी पाठ फिरवली आणि डोळ्यांदेखत हिरवीगार बाग करपू लागली.
पाण्याची वाट पाहता पाहता टमाट्याची फळे कोमेजली, वेली वाळल्या आणि कष्टाने उभे केलेले स्वप्न मातीमोल झाले. अखेर काळजावर दगड ठेवून बाळासाहेब गित्ते आणि त्यांचे वडील कल्याण गित्ते या बाप-लेकांनी आपल्या हातांनीच टमाट्याची बाग उपटून फेकली. ही केवळ एका पिकाची नासाडी नाही, तर दुष्काळाने एका शेतकरी कुटुंबाच्या स्वप्नांवर फिरवलेला नांगर आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथील ४० वर्षीय बाळासाहेब कल्याण गित्ते यांनी वडिलोपार्जित जमिनीतील एक एकर क्षेत्रावर टमाट्याची लागवड केली होती. शेतीतून चार पैसे मिळावेत आणि आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा, या अपेक्षेने त्यांनी या पिकासाठी मेहनत घेतली. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत केली. रोपांची लागवड केल्यानंतर वेळोवेळी खुरपणी, आंतरमशागत, औषधांची फवारणी आणि खतांचा वापर केला.
टमाट्याच्या वेलींची वाढ चांगली झाल्यानंतर बांबू उभे करून तारांच्या साहाय्याने वेलींची बांधणी केली. फुलांचा बहर सुरू झाला आणि पिकाला फळे धरू लागली. बागेचे रूप पाहून गिते कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या. टमाट्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने या एक एकर बागेतून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बाळासाहेबांना होती. त्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले.
खते आणि औषधांचे उधारी केली. पीक चांगले येईल आणि उत्पन्नातून कर्जाची परतफेड करून घरखर्चाला हातभार लागेल, अशी त्यांची आशा होती. मात्र, यंदा पावसाने ओढ दिली आणि या आशांवर पाणी फिरले.
ऐन बहरात आलेल्या टमाट्याच्या बागेला पाण्याची गरज असताना पावसाने दडी मारली. जमिनीत ओलावा राहिला नाही. पाण्याअभावी वेली सुकू लागल्या. बाप-लेकांनी स्वतःच्या हातांनी बाग उपटून टाकली; मात्र या बागेसोबत त्यांच्या आशाही उन्मळून पडल्या.
"शेतीसाठी बँकेचे कर्ज घेतले. खते आणि औषधांची उधारी केली. चार पैसे हातात येतील, या आशेने रात्रंदिवस मेहनत घेतली. पण पाणी नसल्याने संपूर्ण टमाट्याची बाग करपली. लाखभर रुपये खर्च करूनही हातात काहीच आले नाही. आता कर्ज कसे फेडायचे आणि दिवाळी कशी साजरी करायची? पाच हजार रुपयांत लेकराबाळांना नवे कपडे आणि फराळ तरी कसा करणार? सरकारने हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान दिले, तरच शेतकऱ्याला या संकटातून सावरण्यास आधार मिळेल," अशी आर्त भावना बाळासाहेब गित्ते यांनी व्यक्त केली.
दुष्काळाने पिके हिरावली, कर्जाचा भार वाढवला आणि सणासुदीच्या दिवसांतही शेतकऱ्यांच्या घरातील आनंद हिरावून घेतला. साळेगावातील गित्ते कुटुंबाची करपलेली टमाट्याची बाग ही दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या वेदनांचे चित्र आहे. शेतकऱ्याने घाम गाळून उभे केलेले पीक निसर्गाच्या अवकृपेने उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याला केवळ तात्पुरत्या मदतीची नव्हे, तर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक आधाराची गरज आहे. अन्यथा, बागेसोबत उन्मळून पडलेली शेतकऱ्यांची स्वप्ने पुन्हा उभी राहणार कशी, हा प्रश्न अनुत्तरितच राहील.
पाच हजारांत लेकरांची दिवाळी कशी करायची?'
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, पिकावर लाखो रुपये खर्च करून नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत अपुरी असल्याची भावना बाळासाहेब गित्ते यांनी व्यक्त केली. दिवाळीचा सण जवळ आला असताना मुलांना नवे कपडे घ्यायचे, फराळ करायचा आणि घरातील गरजा भागवायच्या कशा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
कर्जाचा डोंगर, हातात मात्र शून्य !
टमाट्याच्या लागवडीसाठी बाळासाहेब गिते यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. पिकाच्या मशागतीपासून ते खत, औषधे आणि फवारणीपर्यंतचा खर्च त्यांनी केला. काही निविष्ठा उधारीवर घेतल्या. पीक हाती आले असते, तर या खर्चाची परतफेड करता आली असती. मात्र, पाण्याअभावी संपूर्ण बागच करपल्याने खर्च केलेली रक्कम वसूल होण्याची शक्यता संपली. कर्जाची परतफेड कशी करायची, उधारी कशी भागवायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.