

Diwali without water! People of Dharur are angry
धारूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दसऱ्याचा सण पावसाच्या पाण्यावर साजरा केल्यानंतर आता दिवाळी असतानाही नळाला पाण्याचा थेंब नाही. प्रभारी अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत नगरपालिकेचे नियोजन ढासळल्याने नाराजी पसरली आहे.
शहरात मागील पंधरा दिवसांपासून बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. काही ठिकाणी खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी सर्वांना त्याचा लाभ मिळत नाही. टँकरवाल्यांकडे पुरेसे टँकर नाहीत, तर सामान्य नागरिकांकडे विकत पाणी घेण्यासाठी पैसा नाही. पहाटेपासूनच महिला आणि वृद्ध पाण्यासाठी विहिरी, बोअर आणि हौदावर रांगा लावत आहेत. नगरपालिका फक्त आश्वासन देते, पण नळ कोरडेच राहतात.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात घरातील स्त्रिया आणि मुलं पाण्यासाठी भटकत आहेत. नगरपालिकेतील प्रभारी अधिकाऱ्यांमुळे सर्वसाधारण प्रशासनिक कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ठळक उदाहरण असल्याचे नागरिकांचे मत आहे. पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पाणीप-रवठ्याच्या प्रश्नावर आता नागरिक आक्रमक भूमिकेत असून, दिवाळीच्या सणावर नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.