Beed Crime : ‘इकोसँड’च्या आडून अवैध वाळू वाहतूक

धारूर पोलिसांची कारवाई; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त, टिप्पर चालकावर गुन्हा
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

धारूर : धारूर -तेलगाव रस्त्यावरील घाटपाटी परिसरात बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा टिपर धारूर पोलिसांनी सापळा रचून पकडला. विशेष म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वाळूवर इकोसँडचा थर पसरवून ही तस्करी केली जात होती. या कारवाईत टिप्पर व २ ब्रास वाळूसह एकूण १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता सुदाम लहाने (वय ४३, रा.ढेगळी पिंपळगाव, ता.सेलू, जि.परभणी) असे आरोपीचे नाव आहे. केजचे सहायक पोलीस अधीक्षक श्री व्यंकटराम यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलगाव रस्त्यावरून घाटातून एका टिप्परमधून अवैध वाळूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले.

Crime News
Beed Political News : उत्साही कार्यकर्त्यांमुळे नेत्यांचीच राजकीय कोंडी!‌

रविवारी (दि.१८) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पोलीस हवालदार धोंडीराम मोरे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद खाडे यांनी दोन पंचांना सोबत घेऊन धारूर येथील घाटपाटी येथे नाकाबंदी केली. त्यावेळी तेलगावकडून धारूरच्या दिशेने येणारा एक पिवळ्या व भुरकट रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ६ टायरी टिप्पर (एम.एच. ४४ यू ८०९१) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अडवला. पोलिसांनी चालकाकडे विचारपूस केली असता, त्याने आपले नाव दत्ता लहाने असे सांगितले.

वाहनाच्या हौदात काय आहे अशी विचारणा केली असता चालकाने बांधकामासाठी वापरण्यात येणारे इकोसँड असल्याचे भासवले. मात्र, पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची बारकाईने पाहणी केली असता, वर सुमारे एक इंचाचा इकोसँडचा थर टाकून खाली बेकायदेशीर वाळू लपवून नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.

चालकाकडे वाळूची कोणतीही रॉयल्टी पावती अथवा शासकीय कागदपत्रे नव्हती. शासनाचा महसूल बुडवून चोरट्या विक्रीसाठी ही वाळू नेली जात असल्याने पोलिसांनी जागीच पंचनामा केला. यात १६ लाख किंमतीचे अशोक लेलँड कंपनीचे हायवा टिप्पर, २० हजार किंमतीची २ ब्रास वाळू असा एकूण १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Crime News
Bhagwan Gad Mahant: तेलंगणात जन्‍म, अध्यात्‍माकडे ओढ, भगवानगडावर शिक्षण, कोण आहेत गडाचे चतुर्थ महंत कृष्‍णा महाराज शास्त्री?

याप्रकरणी पोलीस हवालदार धोंडीराम योगीराज मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्ता लहाने याच्याविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

वाळूमाफियांची ‌‘पुष्पा‌’ स्टाईल!

काही दिवसांपूर्वी आलेल्या पुष्पा या सिनेमामध्ये चंदनाची चोरटी वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवल्या जात असल्याचे दाखवण्यात आले होते. कधी टँकरमधून तर कधी लग्नाच्या वऱ्हाडाच्या माध्यमातून तर कधी बैलगाडी तयार करुन चंदन घेवून गेल्याचे यात दाखवले होते. अगदी तसाच प्रकार धारुरमधील वाळूमाफिया करत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गाडीमध्ये वाळू भरुन वर इको सँडचा थर देवून राजरोस अशी वाहतूक होत असल्याचा हा पहिला प्रकार समोर आला आहे, आता अशा पद्धतीने किती दिवसापासून ही वाहतूक करत महसूल व पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक होत होती की जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते, हा संशोधनाचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news