

धारूर : महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण ६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, या घोषणेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी ओबीसी महिला, ओबीसी सर्वसाधारण, एससी महिला, एससी सर्वसाधारण तसेच सर्वसाधारण महिला या गटांमध्ये आरक्षण होणार आहे.
मराठा कुणबी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्याने या निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः ओबीसी किंवा सर्वसाधारण, तसेच एससी आणि सर्वसाधारण महिला या दोन आरक्षणाकडे भावी उमेदवारांचे लक्ष केंद्रित आहे. गेल्या चार वर्षांपासून नगरपालिका प्रशासकांच्या अखत्यारीत असल्याने लोकप्रतिनिधींना कारभारापासून दूर राहावे लागले. त्यामुळे नागरिकांच्या अपूर्ण राहिलेल्या विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत समस्या येणाऱ्या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहेत. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोण नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार याकडे शहरवासीयांचे उत्सुकतेने लक्ष लागले आहे.