

धारूर : धारूर घाटातील वाढते अपघात, धोकादायक वळणे आणि जीर्ण रस्त्याबाबत दैनिक पुढारीने सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत मोठा निर्णय घेतला आहे. घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 330 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून तातडीच्या दुरुस्ती कामांना तत्काळ गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
8 एप्रिल रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ तसेच लातूर व संभाजीनगर येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत धारूर घाटासह सुमारे 12 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 330 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या कामाचे नियोजन पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आहे.
मात्र, घाटातील सध्याची धोकादायक परिस्थिती लक्षात घेता तातडीच्या दुरुस्तीसाठी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या अंतर्गत साईड पट्ट्यांची मजबुती, संरक्षण भिंतींची उभारणी तसेच रस्त्याची डागडुजी करण्यात येणार आहे.
यामुळे घाटातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. याच बैठकीत केज ते माजलगाव रस्त्याच्या दुरुस्तीचाही विषय चर्चिला गेला असून त्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, धारूर घाटातील अपघात आणि नागरिकांच्या समस्यांवर दैनिक पुढारीने सातत्याने प्रकाश टाकला होता. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून शासनाने थेट मोठ्या निधीची तरतूद करत कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.घाट दुरुस्तीचा निर्णय म्हणजे ‘पुढारी इम्पॅक्ट’चे ठोस उदाहरण ठरत आहे.
धारूर घाटातील अपघातांची गंभीरता लक्षात घेऊन तातडीच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. दोन महिन्यांत प्राथमिक कामे पूर्ण करून वाहतूक अधिक सुरक्षित करण्यावर भर आहे. तसेच दीर्घकालीन विकासासाठी 330 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, असा विश्वास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.