

Dharur Traffic on six routes closed due to heavy rain
धारूर, पुढारी वृत्तसेवा: धारूर तालुक्यात गुरुवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे व धारूर मंडळात तर अतिवृष्टी झाल्याने वाण नदीपात्र भरून वाहत होते व ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने धारूर तालुक्याचा संपर्क शुक्रवारी दुपार पर्यंत सहा ते सात मार्गावरील गावांचा बंद होता. यामुळे सणाचा बाजार असतानाही दुपारपर्यंत बाजारपेठ ही थंड राहिल्या व्यवसायात ठप्प होत नागरिकांची परेशानी झाली. अनेक रस्त्यावरील पूल खचत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने कहर माजवला आहे. वाण नदीच्या पात्रात बुधवारी रात्री दोन ठिकाणी वाहनासह व्यक्ती वाहून जाण्याच्या घटना घडल्या. एका व्यक्तीचा शोधही लागला मात्र आ वरगाव येथील पात्रातून ऑटोरिक्षासह वाहून गेलेल्या अनिल बाबूराव लोखंडे यांचा शोध मात्र आणखीनही प्रशासनास लागलेला नाही.
धारूर मंडळातील अतिवृष्टीमुळे वाण नदीचे पात्र व डोंगरातील नदीचे पात्रही दुथडी भरुन वाहत होते. यामुळे आडस, आसरडोह, चिंचपूर, चारदरी, तांदळवाडी सहा इतर गावांच्या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना नद्या ओसंडून वाहत असल्यामुळे धारूरला येता आले नाही. हे रस्ते शुक्रवारी दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद होती यामुळे धारूरची बाजारपेठ सणाचा बाजार असतानाही दुपारपर्यंत ओस पडली होती. मात्र दुपारनंतर पावसाने उघड दिल्याने बाजारपेठेत थोडा बहर आला. या पावसामुळे कित्येक वर्ष झालेले रस्त्यावरील पूल मोडकळीस येऊ लागले आहेत. तालुक्यातील वाण, लेंडी नदीस इतर लहान मोठ्या नद्याच्या पात्रातील रस्त्यावर असलेले तांदळवाडी, आवरगाव, चोरंबा, हसनाबाद, रुई धारूर, चिंचपूरसह इतर गावातील पूल कधी वाहून जातील हे सांगता येत नाही.
सतत पडणाऱ्या पावसामुळे ते खचत रस्ता उघडा पडत आहे. यातून मोठी दुर्घटना होण्याची तरी प्रशासनाने तात्काळ या अडचणीकडे लक्ष देऊन सध्या तात्पुरती दुरुस्ती करून सर्वच पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी धारूर वाहन संघटना प्रवासी नागरिक करत आहेत.