

शिरूर : शेतात पीक घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडनेटला शार्टसर्किटने आग लागली. या आगीत शेडनेट, ड्रिप्स, फवारणी करण्यासाठी लागणारे विविध साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (दि.१८) दुपारी २ च्या सुमारास घडली. यामध्ये शेतकऱ्यांचे ३० लाखाचे नुकसान झाले आहे.
खालापुरी येथील शेतकरी बळीराम मारुती उगले यांनी आपल्या शेतामध्ये विविध पिके घेण्यासाठी गेल्यावर्षीच पोखरा योजनेअंतर्गत सुमारे ३० लाख रुपये खर्च करून एक एकरमध्ये शेडनेटची उभारणी केली होती. यामध्ये झेंडू, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी, टरबूज अशी विविध पिके त्यांनी घेतली होती. या शेतापासून काही अंतरावरून विद्युत वहिनी तारा गेलेल्या आहेत. या तारांवर शॉर्टसर्किट होऊन आज (शुक्रवारी) दुपारी आगीच्या ठिणग्या जमिनीवरती पडल्या आणि वाळलेल्या गवताने पेट घेतला. इथूनच काही पावलांच्या अंतरावर बळीराम उगले यांचे शेडनेट होते. ही आग पसरत गेल्याने शेडनेटला आग लागून ते काही क्षणात जळून खाक झाले. यामध्ये ठिबकचे पाईप, पिकांना फवारणी करण्यासाठी लागणारे स्पिंकलर, विद्युत मोटार पाईप या वस्तूही जळाल्या.
शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तहसील कार्यालय, कृषी कार्यालय, विद्युत वितरण कंपनी या सर्वांना माहिती देऊनही केवळ लाईनमन भोसले व कृषी सहाय्यक हनुमान सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली मात्र झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अद्याप वेळ मिळाला नाही, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे.