

Kaij Ambajogai Road Sugarcane Tractor Accident
केज : केज-अंबाजोगाई मार्गावरील कुंबेफळ शिवारात बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कारने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोघे जखमी झाले. या अपघातात कार आणि ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून, ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास केज-अंबाजोगाई रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या होंडा कारने (एमएच ४४ जी ३०६०) ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारचा पुढील भाग आणि डाव्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे चक्काचूर झाला. तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे नुकसान होऊन ती रस्त्यावर पलटी झाली. त्यामुळे ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर विखुरला गेला.
या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. जखमी अंबाजोगाई येथील तापडिया कुटुंबातील असल्याची माहिती अपघातस्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिली. जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अपघातामुळे कार आणि ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. ट्रॅक्टरचालकाच्या तक्रारीनंतर बेदरकारपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे केज-अंबाजोगाई मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.