

Illegal Cattle Transport
कडा : कडा जवळील शेरी बु गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १६ नवजात वासरांची कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या कारचा आज (दि.७) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक वासरे गंभीर जखमी झाली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडा जवळील शेरी बु गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी वासरांची वाहतूक करणारी भरधाव कार समोरून येणाऱ्या गाडीला धडकून रस्त्यालगतच्या शेडमध्ये घुसली. या वाहनात १६ नवजात वासरे कोंबून नेण्यात येत होती. अपघातानंतर चालक पळून गेला असून त्याचा मोबाईल घटनास्थळी आढळला. पोलीस कॉन्स्टेबल आहेर यांनी सांगितले की, चालकाचा शोध सुरू असून लवकरच तपास पूर्ण होईल.
अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आणि जखमी वासरांना बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधला. वासरांना तातडीने दवाखान्यात हलवून उपचार करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी तर दूध डेअरीला जात असताना त्यांच्या कॅनमधून दूध काढून त्या वासरांना पाजले.
प्राथमिक चौकशीत या वाहनातून नवजात वासरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी वाहन जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पशुप्रेमी संघटनांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक थांबवावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अपघातानंतर जखमी वासरांना दवाखान्यात हलवण्यात आले, परंतु पुढील देखभालीसाठी त्यांना गोशाळेत हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, काही गोशाळांनी ती वासरे स्वीकारण्यास नकार दिल्याचे उघड झाले. यामुळे पशुप्रेमींमध्ये संताप पसरला असून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.